चकमकीनंतर गट्टेपल्लीचे आठ युवक बेपत्ता

सुरेश नगराळे
मंगळवार, 15 मे 2018

गडचिरोली - भामरागड तालुक्‍यातील कसनासूर येथे झालेल्या नक्षल चकमकीपासून गट्टेपल्ली येथील आठ युवकांचा अद्याप शोध लागला नाही. ते बेपत्ता झाले आहेत. याबाबतची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी अहेरी तालुक्‍यातील पेरमिली येथील उपपोलिस ठाण्यात दिली. मात्र, घटनेला 20 दिवस उलटूनही त्यांचा शोध लागला नसल्याने गावात चिंतेचे वातावरण आहे. चकमकीत मारली गेली नाही, तर मग आमची मुले गेली कुठे, असा प्रश्‍न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

तक्रार दाखल झाल्यापासून पोलिसांनी तपास हाती घेतला; परंतु एकाचीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांना दाखविले होते. त्यांतील एकही नसल्याचे सांगण्यात आले. चेहरे विद्रूप झाल्याने ओळखता आले नाही की आणखी काही वेगळे कारण होते, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. मात्र, आठ तरुण एकाच वेळी बेपत्ता झाल्याच्या घटनेपासून गट्टेपल्ली गावात शोककळा पसरली आहे. मंगेश चंदू मडावी हा युवक भामरागड येथील भगवंतराव शाळेत अकरावीत शिकत होता. नुकतीच परीक्षा देऊन तो मिरची तोडाईच्या कामासाठी तेलंगणा राज्यात गेला होता. त्यानंतर परत आल्यानंतर तो कसनासूर येथे नातेवाइकाकडे लग्नासाठी गेला होता, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तर, अनिता देऊ गावडे हिनेसुद्धा बारावीची परीक्षा दिली होती. तीही बेपत्ता आहे. इरपा वृत्ते मडावी (23), मंगेश बकलू आत्राम (26), रासो पोचा मडावी (22), मंगेश चुंडू मडावी (19), अनिता पेडू गावडे (21), नुसे पेडू मडावी (23) हे सहा युवक-युवती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे.

Web Title: gattepalli 8 youth missing after flint