
कोरोना पॉझिटिव्ह बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यवतमाळ, पुसद व पांढरकवडा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा नवीन स्टेन वेगाने पसरत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. मागील काही दिवसांत एकाच कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह निघाले.
यवतमाळ : कोरोनाचा फेब्रुवारी महिन्यात वाढणारा संसर्ग चिंता वाढविणारा ठरला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने २८ फेब्रुवारीपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. विदेशात कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. आपल्याकडे तशी परिस्थिती नसली तरी कोरोना विषाणूत जनुकीय बदल होत आहे. एका सॅम्पलमध्ये ‘एन४४०के’ स्ट्रेन आढळून आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता स्वत: व कुटुंबाची काळजी घेणे हाच पर्याय असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात आलेल्या कोरोनाने माणसाचे जीवनमान पार बदलून टाकले आहे. कित्येकांना आपल्या जिवाभावाच्या आप्तस्वकीयांना गमवावे लागले. बेरोजगारांसाठी कोरोना काळ हा सत्त्वपरीक्षा पाहणारा ठरला. जानेवारी महिन्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, फेब्रुवारी महिना उजाडताच बाधितांच्या संख्येत वाढ झाली. त्यातच नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ती शक्यता फेब्रुवारी महिन्यात खरी ठरली.
कोरोना पॉझिटिव्ह बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. यवतमाळ, पुसद व पांढरकवडा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाचा नवीन स्टेन वेगाने पसरत असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. मागील काही दिवसांत एकाच कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह निघाले.
अशा चार कुटुंबातील एका व्यक्तीचे सॅम्पल तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातील एका सॅम्पलमध्ये जनुकीय बदल आढळून आला आहे. वैद्यकीय भाषेत त्याला ‘एन४४०के’ म्हटले जाते. समाधानाची बाब म्हणजे चारही व्यक्तींची कोणतीही विदेश भ्रमणासह स्ट्रेनची हिस्ट्री नाही. ‘युके’तील स्ट्रेनसोबत याचा कोणताही संबंध नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
अफवांना घाबरू नका
पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविलेल्या चारपैकी एका सॅम्पलमध्ये एन ४४०के जनुकीय बदल आढळून आला आहे. नैसर्गिक विषाणूत जनुकीय बदल होत राहतात. हा छोटासा बदल आहे. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना घाबरून जाऊ नका. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हॅण्ड सॅनिटाईज या शासनाच्या त्रिसूत्रीचे पालन प्रत्येकाने करावे.
- डॉ. विवेक गुजर,
सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ
कोरोनाचा संसर्ग वाढविण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक, विवाह समारंभ, जानेवारी महिन्यातील सणांची गर्दी कारणीभूत ठरल्याचे निदान वैद्यकीय सूत्रांनी केले आहे. प्रशासनाकडून नियमांत शिथिलता देताच नागरिक बिनधास्त फिरायला लागले. कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले नाही. परिणामी, पुन्हा कोरोनाचा वाढता संसर्ग चिंता वाढविणारा ठरला आहे.
जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला
संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आल्यानंतर नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक होते. मात्र, पहिल्याच दिवशी बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलिसही कमी प्रमाणात दिसून आले. संचारबंदीमुळे नागरिकांनी मास्कचा वापर करायला सुरुवात केली असली तरी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे.