किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळावी ः गडकरी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या महानगराप्रमाणेच चांगली वैद्यकीय महाविद्यालये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन झाली पाहिजे. त्यामुळे गरीब रुग्णांना त्वरित व किफायतशीर वैद्यकीय सेवा मिळेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज व्यक्त केले.
असोसिएशन ऑफ मिनीमल एक्‍सेस सर्जन्स ऑफ इंडिया यांच्याद्वारे नागपुरातील सुरेश भट सभागृहात आयोजित ऍमिस्कॉन 2019 या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्‌घाटन आज यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे, परिषदेचे संयोजक डॉ. प्रशांत रहाटे, संयोजन अध्यक्ष डॉ. गोडे, ऍमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रातील खासगी क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करताना गडकरी म्हणाले, खासगी क्षेत्रालासुद्धा वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढतील व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या रोजगारामध्ये वाढ होईल. भारतातील डॉक्‍टरांची ख्याती ही जगभर पसरली आहे. इंग्लंड तसेच अमेरिकेतसुद्धा त्यांना चांगली मागणी आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
भारतीय शल्यचिकित्सकेची परंपरा ही पाच हजार वर्षे जुनी आहे. प्राचीन वैद्यकशास्त्राची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असल्याचं ऍमिस्कॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पली वेलू यांनी सांगितले.
या परिषदेदरम्यान सुमारे 60 रुग्णांची शस्त्रक्रिया ही सूक्ष्म दुर्बीण, रोबोटिक्‍स आणि लेझर तंत्रज्ञानाद्वारे डॉ. प्रशांत रहाटे यांच्या सेवन स्टार हॉस्पिटल नंदनवन येथे होत आहे. त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण हे सुरेश भट येथील सभागृहातील दालनांमध्ये उपस्थित प्रतिनिधी व प्रेक्षकांना दिसत आहे. या परिषदेदरम्यान पॅरामेडिकल स्टाफ आणि सूक्ष्म दुर्बीण शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे. शल्यचिकित्सकांना त्यांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी या परिषदेप्रसंगी आयोजित दीक्षान्त समारंभात मान्यवरांच्या हस्ते फेलोशिप देऊन गौरविण्यात आले.
या परिषदेत देशविदेशातील चिकित्सक, वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी तसेच पॅरामेडिकल क्षेत्रातील सुमारे पंधराशे प्रतिनिधींचा सहभाग नोंदविला गेला आहे. परिषदेचा समारोप 10 नोव्हेंबर रोजी होईल.
डॉ. प्रकाश आमटे यांना फेलोशिप
गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात बाबा आमटे व त्यांच्या कुटुंबीयांनी समाजसेवेचे व्रत चालू केले. तेच पुढे डॉ. प्रकाश आमटे यांनी आपल्या समाजकार्यातून पुढे नेले, असे सांगून गडकरींनी आमटे दाम्पत्यांच्या कार्यकर्तृत्वाची प्रशंसा केली. याप्रसंगी डॉ. प्रकाश आमटे यांना गडकरींच्या हस्ते ऍमासी (असोसिएशन ऑफ मिनीमल एक्‍सेस सर्जन्स ऑफ इंडिया) ही फेलोशिप प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com