भामरागड : 'त्यांच्या' वेदनांवर फुंकर घालण्यासाठी अख्खा गाव सरसावला!

Ghadoli-Bhamragad-Villagers
Ghadoli-Bhamragad-Villagers

गोंडपिपरी : भामरागडचा महापूर... हजारोंना बेघर करणारा, शेतकऱ्यांनी कष्टाने पेरलेली हजारो हेक्टर शेती डुबविणारा अन् त्या क्षणाच्या अनंत वेदनांचा भंडार आठवणीत साठवणारा... आता पूर ओसरलाय पण वेदनांचा पूर अद्यापही कायम आहे. अशात एका खेडेगावाने त्यांना आगळीवेगळी मदत देत माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात यंदा पावसाने कहर केला. एक दोन नव्हे, तर सतत सातवेळा आलेल्या महापूराने सारंच उद्ध्वस्त झालं. हजारो कुटुंबीय बेघर झालीत. यंदा चांगला पाऊस आहे. त्यामुळे प्रचंड कष्टाने शेतकऱ्यांनी पेरलेली हजारो हेक्टर शेती पुरती डुबली. शेती गेली, घरही गेलं. जीवनाश्यक वस्तू वाहून गेल्याने पोट भरण्याचेही वांदेच, वारंवार येत असलेल्या पावसाने प्रशासनालाही मदतीसाठी मोठी अडचण झाली. अशात पूर ओसरला, पण भामरागडच्या पुरग्रस्तांच्या वेदंनाचा पूर कायम आहे. त्यांना मदतीसाठी अनेक हात समोर येऊ लागले आहेत, पण गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील ग्रामवासियांनी त्यांना केलेली मदत आगळीवेगळी अन् तितकीच प्रेमाचीही ठरली आहे.

घडोली हे साधारणत: शंभर कुटुंबीयांचं गावं. गावकरी शेती करून आपली उपजीविका करतात. यंदा सातत्याने आलेल्या पावसानं त्यांचही बरंच नुकसान झालं. भामरागड येथील महापूराने हजारो नागरिकांच्या आप बितीची माहिती त्यांना मिळाली. अशात आपणालाही काही मदत करता येईल का? याबाबत गावकऱ्यांनी बैठक घेतली अन् मग वेळ आली प्रत्यक्ष मदत करण्याची. गावातील प्रत्येकानीच आपापल्या परीने मदतीचा हात दिला. कुणी तांदूळ दिले. कुणी डाळ दिली. काहींनी भाजीपाला आणि किराण्याचे साहित्य, तर काहींनी नगदी स्वरूपाची रक्कम. बघता बघता बरीच मदत जमा झाली.

गावकऱ्यांनी मदत देण्यासाठी पद्धतशीर नियोजन केले. सात किलो तांदूळ, एक किलो तुळीची डाळ, एक पाव मिरची पावडर व इतर अनेक जीवनाश्यक वस्तूंचा समावेश असलेलं एक किट तयार केलं. अशा एकूण एकशे एक किट्स झाल्या. याचसोबत लहान मुलांसाठी कपडे, पुरूषांना पॅन्ट-शर्ट, धोतर व स्त्रियांना साड्या असं संपूर्ण साहित्यानी भरलेलं वाहन घेऊन गावातील एक्कावन्न महिला, पुरुष, तरुण व लहान मंडळी भामरागडला पोहचली. तेथील तहसिलदारांची भेट घेत त्यांना मदतीबाबतची माहिती दिली आणि आम्ही प्रत्यक्ष गावकऱ्यांना मदत करत असल्याचा मनोदय सांगितला.

तहसिलदारांनी होकार दिला. मग काय ही सगळी मंडळी भामरागडहून कुडापुडी व लगतच्या दोन गावात पोहचली. उपस्थित सर्वांना त्यांनी संपूर्ण मदत देऊ केली. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या भेटीने त्या गावातील नागरिक अक्षरशः भारावले. त्यांना मदतीचा हात देत ही गावकरी मंडळी समाधानाने परतली.

नो प्रोपोगंडा
अलीकडे कुणीही लहानशी मदत दिली, की त्याचा गाजावाजा करतात. मदत लहानशी अन् त्याची जाहिरात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर केली जाते, पण घडोली येथील नागरिकांनी कसलाही प्रोपोगंडा न करता अतिशय समर्पक भावनेने केलेली मदत बरंच काही सांगून जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com