उल्कापात पाहण्याची खगोलप्रेमींसाठी पर्वणी  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

रामन विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर महिन्यात आकाशातील उल्कापाताचा घटनाक्रम होणार आहे. "एकने' या धूमकेतूच्या धुळीमुळे हा उल्कावर्षाव होतो.

नागपूर : नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी होणारा उल्कावर्षाव अवकाशप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. नागपूरच्या आकाशात 16 ते 30 नोव्हेंबरदरम्यान उल्कावर्षाव सोहळा रंगणार आहे. पूर्वांचलात हा उल्कावर्षाव अधिक चांगल्या पद्धतीने अनुभवता येणार असला तरी नागपुरातही अवकाशप्रेमींचा हिरमोड होणार नाही, अशी आशा खगोल अभ्यासकांना आहे. 

रामन विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा नोव्हेंबर महिन्यात आकाशातील उल्कापाताचा घटनाक्रम होणार आहे. "एकने' या धूमकेतूच्या धुळीमुळे हा उल्कावर्षाव होतो. पृथ्वी जेव्हा या धूमकेतूच्या धुळीतून जाते तेव्हा अवकाशातील धुलीकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने ओढले जातात, मात्र पृथ्वीच्या वातावरणात येताच ते जळतात व त्यामुळे ते आपल्याला पाहता येतात. 

प्रचलित भाषेत त्याला तारे तुटणे असेही संबोधले जाते. या महिन्यात होणाऱ्या घडामोडीनुसार 12 नोव्हेंबरला उत्तर टोरिड उल्कावर्षाव, 16 व 17 नोव्हेंबरला लियोनिड उल्कावर्षाव आणि 22 नोव्हेंबरला मोनोसटाईड उल्कावर्षाव होणार आहे. अधिक उल्कावर्षाव पाहण्याची संधी 12 व 13 नोव्हेंबरला मिळणार आहे व तो टोरस तारासमूहात दिसेल. एकने धुमकेतू तुटून तयार झालेल्या 2014 टीजी- 10 या लघुग्रहाच्या धुळीमुळे उल्कावर्षाव होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टोरस तारासमूहात वृषभ राशीत मध्यरात्रीनंतर फायरबाल उल्कावर्षाव पहावयास मिळतो. 6 ते 30 नोव्हेंबर या काळात लियोनिड उल्कावर्षाव होतो व 16 व 17 नोव्हेंबरला तो अधिक प्रमाणात दिसतो. 15 ते 25 नोव्हेंबरदरम्यान मोनोसेटाईड उल्कावर्षाव कर्क राशीजवळ या तारासमूहात दिसणार आहे. सर्वाधिक उल्का 22 नोव्हेंबरला दिसतील. संपूर्ण नोव्हेंबर महिना उल्कावर्षावाचा महिना असल्याने खगोलीय घडामोडीतून ताऱ्यांचा वर्षाव पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींसाठी आहे. 

"उल्का' म्हणजे नैसर्गिक आतषबाजी 
अवकाशप्रेमींच्या भाषेत उल्कावर्षावाला "नैसर्गिक आतषबाजी' म्हटले जाते. या आतषबाजीचा पर्यावरणाला फटका बसत नसल्याने त्याला नैसर्गिक म्हटले जाते. याबाबत रामन विज्ञान केंद्राचे विलास चौधरी यांनी सांगितले, "पृथ्वीच्या आसपास असलेल्या किंवा पृथ्वीच्या बाजूने जाणारा धूमकेतू पृथ्वीच्या वातावरणात आल्यास उल्कापात होतो. या प्रकाराच्या उल्कावर्षावाबाबत खात्रीनिशी काही सांगता येत नाही. एखादेवेळेस उत्तम उल्कावर्षाव होतो अन्यथा फारच कमी होतो. हा उल्कावर्षाव मुळात या धूमकेतूचे अवशेष असतात. परंतु, पृथ्वीच्या वातावरणाशी या अवशेषांचे घर्षण झाल्याने मोठ्या प्रमाणात उष्णता तयार होते. ही उष्णता आपल्याला उल्कावर्षावाच्या रूपात दिसून येते. 

उल्कावर्षाव सिंह व वृषभ राशीमधून 
अवकाशात झालेल्या प्रचंड स्फोटांमुळे ग्रहांची निर्मिती झाली आहे. यातील आकाराने मोठे असलेले ग्रह व उपग्रह म्हणून ओळखले जातात. त्यापेक्षा लहान आकाराचे असलेले कण ताऱ्यासमान भासतात. या तारकांना विशिष्ट आकार असल्यासारखे जाणवते व या आकारावरून त्या तारासमूहाच्या राशी ठरविल्या जातात. सध्याचा उल्कावर्षाव सिंह व वृषभ राशीमधून होणार आहे. हे कण पृथ्वीच्या कक्षेत आले की गुरुत्व शक्तीने ओढले जातात. मात्र, वातावरणात येताच ते जळतात. त्यामुळे ते चमकत पडताना दिसतात. यालाच उल्कावर्षाव म्हणतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gift for astronomers looking for meteors