लग्न जुळत नसल्याने संपविले जीवन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

काही वर्षांपासून प्रयत्न करीत असतानाही लग्न जुळत नसल्यामुळे रश्‍मी विजय दुरणे (३९, रा. श्रीशिव अपार्टमेंट, मनीषनगर) या युवतीने गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर - काही वर्षांपासून प्रयत्न करीत असतानाही लग्न जुळत नसल्यामुळे रश्‍मी विजय दुरणे (३९, रा. श्रीशिव अपार्टमेंट, मनीषनगर) या युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी बेलतरोडीत उघडकीस आली.

रश्‍मी यांना दोन लहान भाऊ आहेत. योग्य वर मिळत नसल्यामुळे रश्‍मी यांचे लग्नाचे वय चाळिशीपर्यंत गेले. लग्न जुळत नसल्याची खंत रश्‍मी यांना बोचत होती. दोन्ही लहान भावंडांचीही लग्न व्हायची असल्यामुळे त्या चिंतेत होत्या. बहिणीच्या लग्नापूर्वी लग्न करायचे नाही, असा निर्णय दोघाही भावंडांनी घेतला होता. त्यामुळे रश्‍मी संभ्रमात होती. भावंडांची लग्न व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. स्वतःचे लग्न जुळत नसल्यामुळे नैराश्‍य आल्याने काही दिवसांपासून रश्‍मी तणावात होत्या.

बुधवारी नातेवाइकांमध्ये लग्न समारंभ असल्यामुळे घरचे गेले होते. रश्‍मी यांनी बाहेरचे दार  लावून बेडरूममध्ये सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी आई घरी आल्यानंतर रश्‍मी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्या. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे शेजाऱ्यांनी धाव घेतली. बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

‘आई-बाबा सॉरी’
रश्‍मी यांनी सुसाइड नोटमध्ये लग्न जुळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला व आई-वडिलांची माफी मागितली. मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये. ‘मम्मी लव्ह यू’ असा भावनिक संदेश लिहिला होता.

Web Title: Girl committed suicide because of no marriage