मी दिसताच मुलगी रडते, पण तरीही तिला जवळ घेता येत नाही

भगवान वानखेडे 
रविवार, 5 एप्रिल 2020

आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करीत असलेल्या एका परिचारिकेचे. हे सगळे सांगत असताना परिचारिकेचा गहीरवर दाटून आला होता.

अकोला : ‘माझी छकुली नुकतीच दीड वर्षाची झाली आहे. माझ्या इतकी गरज तिला दुसऱ्या कुठल्याच वस्तूची नाही. नातेवाईकांकडे सोपवून ‘मी ड्युटीवर येते. आठ तास आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करून घरी गेल्यानंतर माझ्या गाडीचा आवाज ऐकूनच छकुली खिडकीत येते अन् रडायला लागते. ती रडत असली तरी तिला लगेच जवळ घेता येत नाही...हे कथन आहे आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करीत असलेल्या एका परिचारिकेचे. हे सगळे सांगत असताना परिचारिकेचा गहीरवर दाटून आला होता.

कोरोनाच्या या संकटात सर्व समाज जीवन ढवळून निघत आहे. याचा परिणाम नुसता आरोग्यावर नसून, दैनंदिन जगण्यावरही पडला आहे. यामध्ये सर्वाधिक बिकट प्रसंगाना आरोग्य खात्यात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वॉर्डबॉयपर्यंत सर्वचजण सामोरे जात आहेत. तर चक्क आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांचे दैनंदिन जीवनमानच बदलून गेले आहे. याच परिचारिकांचे अनुभव सध्याच्या घडीला जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता परिचारिकांनी सांगितलेले अनुभव समाजमन हेलावून सोडणारे असेच आहेत.
आयसोलेशन वॉर्डमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकेने सांगितले की, आठ तासांची ड्युटी आळी-पाळीने लावलेली आहे. घरी असताना परिवारातील मंडळीच्या भाव-भावनांसोबतच त्यांच्या गरजा पूर्ण करणे, लहान बाळाला त्यांच्याकडे सोपवून ड्यूटीवर निघताना आता आठ तास आपण परत येऊ शकणार नाही....आठ तासानंतरही घरी गेल्या-गेल्या कुटुंबीयात मिसळता येत नाही. हा बदल करणे गरजेचे आहे. मात्र,  एका व्हायरसने किती प्रत्येक क्षेत्राबरोबरच नातेसंबंधावरही परिणाम घडविला असल्याचे त्यांनी सांगतिले.

हेही वाचा - COVID19 : धक्कादायक : प्लास्टिक थैली घालून बजावताय कर्तव्य

समाजाचा दृष्टीकोन बदलल्याची व्यक्त केली खंत
आम्ही कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची परवा न करता मैदानात उतरले आहोत. या लढाईत सक्षमपणे उभे राहण्याची ताकद कुटुंबीयांच्या आधारामुळेच मिळत आहे. मात्र, आम्ही आरोग्य खात्यात काम करीत आहोत आणि तेही कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या परिसरात असतो तेव्हा आम्हालाही त्या आजाराने ग्रासले असल्याचा गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरला आहे. सोशल डिस्टस्टींग नक्कीच पाळा मात्र, मन तोडू नका अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या.

60 रणरागिणी लढतायेत जंग
सध्या सर्वोपचार रुग्णालयातील आइसोलेशन वार्डसह वॉर्ड क्रमांक 21,24,25, 26, 10, 11, 12, 13 आणि 27 या वॉर्डमध्ये प्रत्येक सहा अशा एकुण 60 परिचारिका सिफ्टनुसार सेवा देत आहेत. यांच्यासोबत एक इन्जार्चही कार्यरत असतो. या सगळ्या परिचारिका जीवाची परवा न करता तुम्हा-आम्हांसाठी सेवा देत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The girl cries as soon as I see her, but she still can't get close