एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूहल्ला, ग्रामस्थांकडून आरोपीला चोप

मुनेश्‍वर कुकडे
Thursday, 29 October 2020

पीडित तरुणी ही घरी स्वयंपाक करीत असताना अचानक अतुल घराच्या मागच्या बाजूने आला आणि तुला जिवानिशी ठार मारेन, असे म्हणत तिच्या पोटावर चाकूने हल्ला केला.

तिरोडा (जि. गोंदिया): एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणाच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना घडली. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना चांदोरी खुर्द येथे मंगळवारी (ता.27) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अतुल ओमप्रकाश शिवणे (वय 26, रा. कापसी खुर्द, जि. नागपूर), असे आरोपीचे नाव आहे. 

यातील पीडित तरुणी ही घरी स्वयंपाक करीत असताना अचानक अतुल घराच्या मागच्या बाजूने आला आणि तुला जिवानिशी ठार मारेन, असे म्हणत तिच्या पोटावर चाकूने हल्ला केला. तरुणीने विरोध केला असता त्याने पुन्हा तिच्या पोटावर, गळ्यावर वार केला. यावेळी तिला हल्ल्यातून वाचविण्यासाठी तिची आई धावून आली. मात्र, आरोपीने तिच्या आईलादेखील खाली पाडले. दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर शेजारचे धावून आले. त्यामुळे आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.

हेही वाचा - मनेका गांधींच्या फोनवरून टळला दोन बोकडांचा बळी

दरम्यान, गावकऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला असता, आरोपीने वैनगंगा नदीत उडी घेतली. गावकऱ्यांनी त्याला नदीतून बाहेर काढत चांगलेच चोपले.  उल्लेखनीय म्हणजे, आरोपी युवकाने यापूर्वीदेखील पीडित युवतीला अनेकदा त्रास दिला. तसेच तिचे अपहरण केले होते. त्याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकही करण्यात आली होती.

हेही वाचा - विधान परिषद निवडणूकीसाठी कॉंग्रेसमध्ये २५० वर इच्छुक,...

तथापि, या घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव, ठाणेदार उद्धव दमाळे, पोलिस उपनिरीक्षक लाला लोणकर, कर्मचारी अमरसिंग वसावे, राधा लाटे, मुकेश थेर, गिरीश पांडे ,सव्वालाखे यांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता गावकऱ्यांनी पोलिसांना विरोध करून आरोपीला आम्ही शिक्षा देऊ असा पवित्रा घेतला. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी गोंदिया पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली होती. तेव्हा आरोपीला ताब्यात घेऊन उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पाठविण्यात आले. हल्ल्यातील जखमी तरुणीला उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या चांदोरीत तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl injured in knife attack at tiroda of gondia