"हौसला भीं हैं... उडान भीं भरेंगे' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

बांगलादेशमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेसाठी नागपूरच्या कल्पना सातपुते, मंगला अडमकर व पिंकी तोमर आणि अमरावतीच्या ऋतुजा कवठाळेची भारतीय संघात नुकतीच निवड झाली. गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणी शिबिरातील कामगिरीच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली.

नागपूर  : "मंजिले उन्हीं को मिलती हैं, जिनके सपनों में जान होती हैं, पंखो से कुछ नही होता, हौसलों से उडान होती हैं' या प्रेरणादायी ओळी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात स्थान पटकाविणाऱ्या विदर्भाच्या मुलींसाठी तंतोतंत लागू पडतात. विपरीत परिस्थितीत संघर्ष करून उंच झेप घेऊ पाहणाऱ्या या वैदर्भी मुलींची प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, स्पर्धेत छाप सोडून विदर्भासह देशाला नावलौकिक मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. 

बांगलादेशमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेसाठी नागपूरच्या कल्पना सातपुते, मंगला अडमकर व पिंकी तोमर आणि अमरावतीच्या ऋतुजा कवठाळेची भारतीय संघात नुकतीच निवड झाली. गुजरातमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणी शिबिरातील कामगिरीच्या आधारावर त्यांची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पहिल्यांदाच निवड झाल्याने त्या कमालीच्या खुश आहेत. भारतीय संघातील निवड आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठा दिवस असल्याचे सांगून, आतापर्यंतच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे कल्पनाने सांगितले. बांगलादेशविरुद्ध विजेता होऊनच भारतीय संघ मायदेशी परतेल, असा तिला विश्‍वास आहे. 

भारतीय संघाची उपकर्णधार असलेली कल्पना विवाहित असून, उजव्या पायाने अपंग आहे. तर, मंगलाचे पाय तिरपे व ऋतुजाला जन्मापासूनच पंजा नाही. पिंकी पोलिओग्रस्त आहे. कुणाचे आईवडील गोट्यामातीचे काम करतात, तर काहींच्या डोक्‍यावरील वडिलांचे छत्र हरविले आहे. विविध व्याधी अन्‌ अडचणी असूनही त्यांनी आपले क्रिकेटप्रेम जपले आहे. सर्व जणी दररोज उमरेड रोडवरील एस. बी. सिटी महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गुरुदास राऊत व महाराष्ट्र राज्य दिव्यांग क्रिकेट संघटनेचे सचिव धीरज भोसकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक नितेंद्र सिंग यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. 
 

शहराच्या मध्यभागी हवे मैदान 

एस. बी. सिटी महाविद्यालयाच्या मैदानावर मुलींना सरावासाठी तात्पुरती जागा देण्यात आली असली तरी, तिथे मुलांचा प्रचंड "डिस्टर्बन्स' राहात असल्यामुळे त्यांना "कम्फर्टेबल' वाटत नाही. त्यामुळे सरावासाठी सर्वांच्या सोयीचे शहरातील मध्यभागी हक्‍काचे ठिकाण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. तसे पत्रही त्यांना महापौरांना दिले आहे. काहींना सरावासाठी जयताळा येथून उमरेड रोडवर यावे लागते. येण्या-जाण्यातच संपूर्ण "स्टॅमिना' निघून जातो. व्हीएनआयटी किंवा आंबेडकर मैदान सरावासाठी मिळावे, असे त्यांची इच्छा आहे.

  
युवापिढी घडवायचीय 

दोन मुलांची आई असलेली कल्पना ही सद्यस्थितीत 40 वर्षांची असून, खेळाडू म्हणून तिच्याकडे आता कमी दिवस उरले आहेत. त्यामुळे भविष्यात प्रशिक्षक बनून शहरातील तरुण मुलींना "मोटिव्हेट' करण्याची इच्छा तिने बोलून दाखविली. क्रिकेट खेळण्यास इच्छुक मुली पुढे आल्यास नागपूरचा संघ तयार होऊ शकतो, असे सांगून तिने मुलींना क्रिकेट खेळण्याचे आवाहन केले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girls of Vidarbha who have made a place in the Indian Divine Cricket Team