यवतमाळला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व द्या!

1
1

यवतमाळ : 17 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. यवतमाळ जिल्ह्याने यावेळी युतीचे दोन खासदार निवडून दिले. आजपर्यंतच्या इतिहासात केंद्रीय माजी राज्यमंत्री हंसराज अहीर सोडले तर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. आतातरी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रिपद देऊन जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, अशी मागणी जिल्ह्यातील जनतेकडून होत आहे.

लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना एक लाख 17 हजार 939 मते मिळाली. तर, हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील दोन लाख 77 हजार 856 इतक्या प्रचंड मतांनी विजयी झाले. यवतमाळ जिल्हा मागास, आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित व शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी व शेतमजुरांनी केल्या आहेत. जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे सर्वाधिक बेरोजगारी व स्थानांतरणाची समस्या या जिल्ह्यात आहे.

हा जिल्हा राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. यवतमाळ-वाशीम, हिंगोली व चंद्रपूर-आर्णी या तीन लोकसभा मतदारसंघात जिल्हा विभागला गेला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचे नेतृत्व केंद्रात तीन खासदार करतात. विस्ताराने मोठा असलेला हा जिल्हा विदर्भ व मराठवाड्याचे नेतृत्व करतो. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या जिल्ह्याची ओळख होती. त्यामुळेच तत्कालीन केंद्रीयमंत्री व काँग्रेसचे हेवीवेट नेते गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसने यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. परंतु, गेल्या 2009 पासून प्रत्येक निवडणुकीत सातत्याने यवतमाळ-वाशीम लोकसभेतून शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार भावना गवळी यांना याच मतदासंघाने मताधिक्य दिले आहे. तर चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार हंसराज अहीर यांना मावळत्या केंद्रीय मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली. हे या जिल्ह्याचे भाग्य. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहास असे प्रथमच घडले आहे. ज्या जिल्ह्याने महाराष्ट्राला 11 वर्षे मुख्यमंत्रीपद दिले, ज्या जिल्ह्याची राज्याच्या राजकारणाला दिशा दिली, दिग्गज राजकारणी दिले, राज्यसभेचे खासदार दिले, त्या जिल्ह्याची मात्र कायम उपेक्षाच सुरू आहे.

परिणामी, जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. विपुल वनसंपदा व नैसर्गिक साधनसंपत्ती, ब्लॅक डायमंड व कॉटन बेल्ट (डिस्ट्रिक्ट) म्हणून नावलौकिक असलेला जिल्हा मात्र विकासापासून कोसो दूर आहे. याला कारण म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचा एकही मंत्री अद्याप जिल्ह्याला लाभला नाही. केंद्रात पुन्हा स्थापन होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, अशी जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे. 

मराठवाडा व विदर्भाला न्याय द्यावा
जनतेने मराठवाड्यातील हिंगोली व विदर्भातील यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे दोन खासदार प्रचंड मताधिक्क्याने लोकसभेत निवडून पाठविले आहे. ते दोन्ही खासदार मंत्रिपदाचे दावेदार आहेत. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून टाकण्यासाठी, बेरोजगारी दूर करण्यासाठी, नवे उद्योग, प्रकल्प व सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी, त्यांची क्षमता वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारमध्ये मराठवाड्यातून खासदार हेमंत पाटील व विदर्भकन्या म्हणून खासदार भावना गवळी यांना आपल्या मंत्रिमंडळात संधी द्यावी, अशी मराठवाडा व विदर्भातील जनतेची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com