शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ त्वरित द्या : परिवहनमंत्री रावते

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 जून 2019

यवतमाळ : शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पीकविम्याची बहुतांश रक्कम शासनातर्फे भरली जाते. शेतकऱ्यांना केवळ नाममात्र रकमेचा भरणा करावा लागतो. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, ज्यांनी क्‍लेम केले आहे, अशा शेतकऱ्यांना पीकविम्याचा त्वरित लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सूचना परिवहन व खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी केल्या. वणी तालुक्‍यातील सावर्ला व वणी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधीक्षक व कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, अविनाश सोमलकर, तहसीलदार श्‍याम धनमने, सरपंच विनोद चोपणे आदी उपस्थित होते. विमासंदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येतात, असे सांगून परिवहन मंत्री रावते म्हणाले, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीच शेतकरी संवाद घेण्यात येत आहे. क्‍लेम मंजूर झाला असेल आणि बॅंकेच्या काही अडचणी असेल तर त्या त्वरित सोडवाव्यात. विमा कंपनीने शेतकऱ्यांना त्वरित रक्कम उपलब्ध करून द्यावी. विम्याच्या लाभासाठी आता आधारकार्डचा उपयोग करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. याबाबत ग्रामसेवक आणि सरपंचांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी. पीकविम्यासंदर्भात सर्व कंपन्यांची बैठक लवकरच मुंबईत घेण्यात येईल. या संदर्भात दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असे ते म्हणाले.
पीकविमा संदर्भात पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. विम्याच्या रकमेचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आनंदासाठी काम करा, असेही ते म्हणाले. जनावरांकडून होणारे पिकांच्या नुकसानीनुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांना बियाणे, खतांचे वाटप
पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढविलेल्या शेतकऱ्यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते बियाणे आणि खतांचे वाटप करण्यात आले. पठारपूर येथील नागो टेंभुर्डे, बाबाराव महाकुलकार, कुंद्रा येथील बाबाराव उपासे, माधव आसुटकर, कोलगाव येथील मंदा लांबट, शिवनाळा येथील फुलाबाई आत्राम, धानोरा येथील संतोष वासाड यांच्यासह वणी, मारेगाव आणि झरीजामणी येथील शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचे वाटप करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give the farmers the benefit of crop insurance immediately: Transport Minister Ravte