दोन हजार द्या; अवैध नळ कनेक्शन घ्या!

राजदत्त पाठक
रविवार, 22 डिसेंबर 2019

सध्या जुने कनेक्शन बंद करून नवीन कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. नवीन कनेक्शन घेण्यासाठी अनामत रकमेसह सात हजार रुपयांचा भरणा करावा लागतो. 

वाशीम : नगर पालिकेत पैसे कमविण्यासाठी कोण कसा फंडा वापरेल हे सांगता येत नाही. असाच एक फंडा आता पाणीपुरवठ्याच्या नवीन नळ कनेक्शन बाबत राबविण्यात येत असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. केवळ दोन हजार रूपये द्या; अन् अवैध नळ कनेक्शन घ्या, असा फंडा पाणीपुरवठा कंत्राटदाराचे काही कर्मचारी राबविताना दिसून येत आहेत. यामुळे शहरवासीयांच्या सुविधेसाठी कायान्वित करण्यात आलेली वाढीव पाणीपुरवठा योजना प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

शहरातील जुनी पाणीपुरवठा योजना कालबाह्य झाली होती. त्यामुळे शहरात नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. असोसिएट या कंपनीला त्याचे कंत्राट देण्यात आले. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात मोठे जलकुंभ उभारण्यात आले. तसेच नवीन पाईपलाइन टाकण्यात आली. योजनेचे कामही पूर्ण झाले. सध्या जुने कनेक्शन बंद करून नवीन कनेक्शन देण्याचे काम सुरू आहे. नवीन कनेक्शन घेण्यासाठी अनामत रक्कमसह सात हजार रुपयांचा भरणा करावा लागतो. 

हेही वाचा - शेतकऱ्याने काढले कुटुंब विक्रीला

कंत्राटी कर्मचाऱ्याचा ‘फंडा’
शहरातील प्रामाणिक नागरिक नियमानुसार रकमेचा भरणा करून नवीन कनेक्शन घेत आहेत. मात्र, काही दिवसांपासून कंत्राटदाराचे असलेले कंत्राटी कर्मचारी कनेक्शन देण्याकरिता एक नवीन फंडा अवलंबित असल्याचे दिसून येत आहे. शहरातील विविध भागातील नागरिकांना पटवून केवळ दोन ते तीन हजारात नवीन नळ कनेक्शन देत असल्याचा फंडा ते राबवीत असल्याचे वृत्त आहे. 

महत्त्वाची बातमी - जाहीर सभेला गालबोट, वाहनांची तोडफोड

पाणी पुरवठा योजना होणार प्रभावित
आधीच शहरात अवैध नळ कनेक्शनची संख्या जास्त आहे. त्यातच हे कंत्राटी कर्मचारी केवळ दोन ते तीन हजार रुपये घेऊन नळ कनेक्शन देत असल्याने अवैध नळ कनेक्शनची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे. नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना करूनही नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

क्लिक करा - अवघ्या 27 व्या वर्षीच बनला न्यायाधीश

पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची गरज
शहरातील अनेक भागात जुनी आणि नवीन अशा दोन पाइप लाइन आहेत. त्यामुळे लाखाळा परिसरात भरपूर पाणीपुरवठा होतो. एक दिवसाआड नळ येत असल्याने अनेकवेळा पाण्याचा अपव्यय होतो. पाणी रस्त्यावरून नाल्यातून वाहताना दिसते. त्यामुळे नगर पालिकेच्या पाण्याची बचत करा; या आवाहनाला पालिका प्रशासनच हरताळ फासतांना दिसून येत आहे. नागरिकांना नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठ्याच्या नियोजनाची गरज आहे.

सविस्तर वाचा - देणार होते आठ हजार, मात्र जमा झाले चार-पाच हजार

नळाचे मिटर नावालाच
नवीन वाढीव पाणीपुरवठा योजना कायान्वित झाल्यानंतर नवीन नळ कनेक्शन देताना शहरातील अनेक भागात नळावर मिटर देण्यात आले. त्या मिटरचे पैसे सुद्धा ग्राहकांकडून वसूल करण्यात आले. मात्र, नळावरील एकही मिटर अद्याप सुरू झालेले नाही. नव्हे मिटरनुसार पाणीपुरवठाच केला जात नाही. त्यामुळे मिटरचा भ्रृदंड आम्हाला कशाला दिला, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत.

चौकशी करून कडक कारवाई
नवीन वाढीव पाणीपुरवठ्याचे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये काही रक्कम घेऊन जर अवैध नळ कनेक्शन दिले जात असेल तर ही गंभीर बाब आहे. याची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
-पंकज सोनोने, अभियंता, पाणीपुरवठा विभाग न.प. वाशीम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give two thousand; Get invalid tap connection!