"लक्ष्मी' घडवणाऱ्या हातांना हवे प्रकाशाचे दान!

 वेलतूर ः मातीच्या कामात व्यस्त असलेले मूर्तीकार दाम्पत्य.
वेलतूर ः मातीच्या कामात व्यस्त असलेले मूर्तीकार दाम्पत्य.

वेलतूर (जि.नागपूर) :  दिवाळी सणाच्या पूजनासाठी "लक्ष्मी' घडवणारे शेकडो हात खऱ्या "लक्ष्मी'साठी लाचार असून स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही दारिद्य्राने अगतिक होत आहेत. मातीपासून गृहोपयोगी साहित्य व नानाविध पारंपरिक मूर्ती घडवून कुंभार बांधव संसाराची गाडा कसाबशी रेटत आहेत. समाजातील बावीस कुटुंबांपैकी अठरा कुटुंबे दारिद्य्र रेषेखाली आहेत. यावरून समाजातील दयनीय अवस्था लक्षात येते. त्यांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. त्यांच्या विकासासाठी आश्वासनांची नव्हे तर कृतिशील प्रयत्नांची निकड जाणकार व्यक्त करीत आहेत.
कुंभार समाजाच्या अनेक समस्या असून अपंगत्व व दिव्यांगांची संख्या मोठी आहे. प्रत्येक कुटुंबात दिव्यांग सदस्य आहेत. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी पेलण्याचे दिव्य ते सध्या पार पाडत आहेत. आडवळणाचे झोपडीवजा घर, अस्वच्छ हवा, सूर्यप्रकाशाचा अभाव त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. दिवसभर घराच्या कोंदट वातावरणातील त्यांचे काम, माठ वा इतर साहित्य भाजण्याच्या भट्ट्या व त्यातून निघणारा धूर त्यांना श्वसनाचे रुग्ण करीत आहे. श्वसन रुग्णांची येथे मोठी संख्या असल्याची माहिती वेलतूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेवकांनी "सकाळ'ला दिली. त्यांच्यावर येथे नियमितपणे उपचार सुरू आहेत.
"बिदागी' झाली बंद
मोठ्या शेतकऱ्यांकडून वर्षाला मिळणारी "बिदागी' आधुनिक जीवनशैलीत बंद झाली आहे. "बिदागी' म्हणजे पीकमळणी झाल्यावर बक्षीस म्हणून दिले जाणारे राशीवरचे धान्य. त्या बदल्यात कुंभाराने त्यांना थंड पाण्याचे माठ, रांजण, पूजेच्या मूर्ती व इतर त्यांनी मातीपासून घडवलेली साहित्य शेतकऱ्यांस वा कुटुंबास पुरवायचे. पूर्वी या बिदागीतून कुटुंबे पोसली जायची. पण आता परिस्थिती बदलली असून सरकारच्या अंत्योदय योजनेच्या मिळणाऱ्या धान्यावर ते जगत आहेत. त्यांचा हाही आधार अनेक जाचक अटींमुळे जाण्याच्या तयारीत आहे. अनेकांनी दारिद्य्राला कंटाळून आपला पारंपरिक व्यवसाय सोडला आहे. कुंभाराकडे दुसऱ्या व्यवसायाचे कसब नसल्याने ते त्यात अपयशी ठरत आहेत.
कच्चा माल महाग झाला आहे. नोंदणीकृत ग्रामीण कुंभार कारागिरांना अनुदान व शिष्यवृत्ती मिळावी.
चिमन अंबागडे, मूर्ती कारागीर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com