सोने 36 हजारांवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूर ः देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची मागणी वाढत असल्याने बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या चार महिन्यांत सोन्याच्या दरात प्रतितोळा 3590 रुपयांची वाढ झाली. आज सोने प्रतितोळा 36 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहे. दिवाळीपर्यंत सोने 42 हजारावर जाण्याची शक्‍यता वर्तवली जाते. गेल्या आठ दिवसांत सोने 2500 रुपयांनी वाढले आहे.

नागपूर ः देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याची मागणी वाढत असल्याने बाजारात सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. गेल्या चार महिन्यांत सोन्याच्या दरात प्रतितोळा 3590 रुपयांची वाढ झाली. आज सोने प्रतितोळा 36 हजार 400 रुपयांवर पोहोचले आहे. दिवाळीपर्यंत सोने 42 हजारावर जाण्याची शक्‍यता वर्तवली जाते. गेल्या आठ दिवसांत सोने 2500 रुपयांनी वाढले आहे.
जागतिक बाजारात सोन्याला मागणी वाढली. याशिवाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉरचा परिणामही सोने दरावर झाला. यातच केंद्र सरकारने सोन्याच्या करात अडीच टक्‍क्‍यांनी वाढ करून दरवाढीस हातभार लावला. परिणामी, देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने उसळी घेतली. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एक एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 32 हजार 800 रुपये होता. अमेरिका आणि चीनमधील "ट्रेड वॉर'ची तीव्रता वाढली. जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली. लग्नांचे मुहूर्त आणि सणासुदीच्या दिवसांमुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याची मागणी वाढल्याने याचा परिणाम दरवाढीवर झाला. आज सोन्याचा दर 36 हजार 400 रुपये तर चांदी 41 हजार 800 प्रतिकिलोवर पोहोचली. गेल्या आठ दिवसात सोने 2500 रुपयांनी वधारले आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यावर अडीच टक्के कर वाढवल्याची घोषणा केली. याचा तातडीने परिणाम सोन्याच्या दरवाढीवर झाला आहे.
खरेदीत 39 हजारांपलीकडे
गुंतवणूकदारांनी सोन्याची खरेदी थांबवली आहे. अत्यावश्‍यक व किरकोळ खरेदी सुरू असल्याने उलाढाल कमी झाली. दागिन्यांची खरेदी करताना ग्रॅमला मजुरीचे दर वेगळे पकडले जातात. दागिन्यांच्या प्रकारानुसार ग्रॅमला 200 ते 800 रुपयांपर्यंत मजुरीचे दर आहेत. सरासरी 300 रुपये मजुरीचा दर गृहित धरल्यास प्रतितोळा तीन हजार रुपयांची वाढ होते. म्हणजेच दागिने खरेदी करताना प्रतितोळा दर सुमारे 39 हजारांच्या पलीकडे जातो.
दिवाळी दोन महिन्यांवर आली असून घाऊक बाजारात सोने खरेदीला प्रारंभ झालेला आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढू लागल्याने दर वाढू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय अस्थिरतेचा परिणाम सोन्याच्या दरावर झाल्याने सोने प्रतितोळा 42 हजारांचा आकडा गाठेल.
राजेश रोकडे, संचालक रोकडे ज्वेलर्स


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold at 36 thousand