सोने पार्श्‍वभागात ‘पेस्ट फॉर्म’मध्ये लपवून तस्करी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

असे आहेत नियम 
२० लाखांपेक्षा कमी किमतीच्या सोन्याच्या अवैध वाहतुकीवर केवळ दंड आकारण्यात येतो. २० लाख किंवा त्यापेक्षा अधिक सोने असल्यास अटक करता येते. परंतु, जामीनही मिळतो. एक कोटी किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने अवैधपणे आणले असेल, तर मात्र, अटकेनंतर जामीन मिळत नाही.

नागपूर - पार्श्‍वभागात लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून २५ लाख ३० हजार किमतीचे ८७० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार तस्करांपैकी एक मुंबईचा तर दुसरा तमिळनाडूचा राहणारा आहे. दोघेही एअर अरेबियाच्या विमानाने शारजा येथून पहाटे ४.१५ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचले. नागपूर स्थानकावर उतरल्यानंतर त्यातील एक जण मुंबईचे तिकीट काढण्यासाठी काउंटरवर गेला. संशयास्पद हालचालीमुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना शंका आली.

त्याच्याजवळ जात असताना तो पळून जाऊ लागला. यामुळे जवानांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याचा अन्य कुणी साथीदार असण्याची शक्‍यता लक्षात घेता. अन्य प्रवाशांवर पाळत ठेवण्यात आली. संशयाच्या आधारे दुसऱ्यालासुद्धा ताब्यात घेण्यात आले. एक्‍सरे आणि स्कॅनरच्या मदतीने तपासणी केली असता ते शरीरात काहीतरी लववून घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत त्यांनी पार्श्‍वभागात ‘पेस्ट फॉर्म’मधील सोने लपवून आणल्याची बाब कबूल केली. 

दोघेही एकाच विमानातून सोने घेऊन आले असले तरी त्यांचा आपसांत कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात येत आहे. तमिळनाडूचा राहणारा दीवान सैयद इस्माईल याच्याकडे १२.१ लाख किमतीचे ४१७ ग्रॅम सोने तर मुंबईचा राहणाऱ्या अब्दुल रहमान अब्दुल लतीफ याच्याकडे १३.२३ लाख किमतीचे ४५६ ग्रॅम सोने आढळले. त्यांच्याकडे सोने असल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांना पाचारण करण्यात आले.

नियमानुसार एका प्रवाशाला २० लाखांहून अधिक किमतीचे सोने नेता येत नाही. त्यांच्याकडे आढळलेले सोने त्यापेक्षा कमी असल्याने बयाण नोंदवून घेतल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

विमानतळावरील अधिकाऱ्यांकडून या विषयावर कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. दोघेही एकमेकांना ओळखत नसल्याचे भासवीत असले तरी कारवाईच्या कचाट्यात सापडू नये, या दृष्टीने दोघांनी सोने वाटून आणले असावे, अशी शक्‍यताही वर्तविली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Smuggling Crime