पुढील पाच वर्षे लघुउद्योगांना सुवर्णकाळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.

नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व्यक्त केला.
शहर भाजप व खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीतर्फे नवनिर्वाचित खासदार व केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज सकाळी प्रथमच नागपुरात आलेले नितीन गडकरी यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित गौरव समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, जि. प. अध्यक्षा निशा सावरकर, शहर भाजपाध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर देशमुख, जिल्हा भाजपचे अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नगरसेवक, मनपातील पदाधिकारी, जि. प. सदस्य, मंडळ अध्यक्ष, महामंत्री, ग्रामीण व शहरातील बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. गडकरी यांनी नामांकन अर्ज दाखल करताच विजय निश्‍चित झाला. परंतु, काही लोकांनी आभास निर्माण केला. आराखडे बांधले, मोठमोठ्या वल्गना केल्या. मात्र, जनता नितीन गडकरी यांच्याच पाठीशी राहिली, असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना हाणला. गडकरी यांच्या नेतृत्वात देशाच्या विकासासोबतच नागपूरचाही विकास झाला. त्यांनी नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय शहर केले. त्यांनी सर्व जाती, पंथ, धर्मांच्या लोकांची कामे केली, त्यांना मदत केली. प्रत्येकाच्या जीवनात गडकरींनी परिवर्तन घडविले, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी काढले. यावेळी कमळाच्या फुलांच्या मोठ्या पुष्पहाराने गडकरी, फडणवीसांचा सत्कार करण्यात आला.
हा विजय कार्यकर्त्यांचा ः गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी कार्यकर्ता हा आपल्या परिवारातील आहे. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या परिश्रमामुळेच विजय मिळाला. हा माझा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा विजय आहे. आभार व्यक्त करून औपचारिकता पार पाडणार नाही, मी तुमचे ऋण व्यक्त करतो, असे भावोद्‌गार यावेळी गडकरींनी काढले.
कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला
शहरातील दोन्ही लाडके नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसून आला. रात्री सव्वाआठपासून सुरू झालेला सत्काराचा कार्यक्रम रात्री अकरापर्यंत सुरू होता. कार्यकर्ते, पदाधिकारी रांगेने पुढे सरकत गडकरी यांचा सत्कार करीत होते.
नितीन मुकेश यांच्या गीतांनी मंत्रमुग्ध
गायक नितीन मुकेश यांनी अडीच तास कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनाच नव्हे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मंत्रमुग्ध केले. वडील मुकेश यांची गीते गात नितीन मुकेश यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. एकापेक्षा एक सरस गीते सादर करीत त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व गडकरींनी त्यांचा सत्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Golden Age for small business the next five years