गोळवलकर गुरुजींच्या स्मारकावर राहिले फक्त 'इदं न मम'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

टिळकनगर : सध्या दिल्लीपासून नागपूरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा सांगणाऱ्या भाजपची सत्ता आहे. पण, त्याच नागपुरातील टिळकनगरात द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने असलेल्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनाही या स्मारकाबाबत काहीही माहीत नाही. 

टिळकनगर : सध्या दिल्लीपासून नागपूरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा सांगणाऱ्या भाजपची सत्ता आहे. पण, त्याच नागपुरातील टिळकनगरात द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या नावाने असलेल्या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांनाही या स्मारकाबाबत काहीही माहीत नाही. 

2004 मध्ये या वॉर्डाचे भाजपचे तत्कालीन नगरसेवक संजय बंगाले यांनी त्यांच्या वॉर्ड निधीतून हे स्मारक उभारले व त्याचे सौंदर्यीकरण केले. त्यावर गुरुजींच्या छायाचित्रांवर असलेले "राष्ट्राय स्वाहा, इदं न मम' हे संस्कृत वचन व मशालीचे प्रतीक लावले. स्वत: बंगाले यांनी हे स्मारक गोळवलकर गुरुजींच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधल्याची माहिती दिली. आता मात्र या स्मारकाची तोडफोड झाली आहे. जागोजागी दारूच्या बाटल्या, लोकांनी फेकलेला कचरा पडला आहे. झाडे वाढली आहे. संस्कृत वचनातील "राष्ट्राय स्वाहा' कधीच बेपत्ता झाले... आता राहिले फक्त "इदं न मम'... भग्नावस्थेत दिवस काढत असलेले हे स्मारक गोळवलकर गुरुजींचे आहे, हे सांगूनही खरे वाटणार नाही, अशीच ही स्थिती आहे. 

मनपाच्या वॉर्ड फंडातून पूर्ण झालेल्या या स्मारकाची योग्य काळजी 2008 पर्यंत घेतली जात होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपला आणि स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्षच होत गेले. विशेष म्हणजे हे स्मारक कोणाचे आहे, त्याची पडझड का व कधी झाली, तेथे नेमके काय होते, याची माहितीही टिळकनगरातील बऱ्याचशा नागरिकांना नाही. हा भाग प्रभाग क्रमांक 14 मध्ये येत असून येथे चार नगरसेवक आहेत. त्यापैकी तीन नगरसेवक भाजपचे तर एक कॉंग्रेसचा आहे. तसेच महिला व बालविकास समितीच्या सभापतीदेखील याच प्रभागाच्या नगरसेविका आहेत. तरीही या स्मारकाच्या नशिबी भग्नावस्थेचा वनवास आला आहे. 

माझ्या कार्यकाळात एकूण दहा चौकांचे सौंदर्यीकरण मी केले. त्यात या स्मारकाचा समावेश होता. 2008 साली माझा कार्यकाळ संपला. त्यानंतरही मी या स्मारकाच्या देखभालीसाठी मनपाकडे दोनदा पत्रव्यवहार केला. मात्र, हवे तसे यश मिळाले नाही. 
- संजय बंगाले, नगरसेवक 

स्मारकाची सद्यस्थिती मला माहीत आहे. काही दिवसांपूर्वी शेजारच्या गॅस गोडाऊनच्या ट्रकची धडक बसल्याने स्मारकाचे नुकसान झाले. या स्मारकाचे नूतनीकरण लवकरच करणार आहे. तसेच तेथे कचरा टाकणाऱ्यांवरही कारवाई करू. 
- प्रगती पाटील, नगरसेविका 

गुरुजी नेहमीच व्यक्‍तिपूजेच्या विरोधात असल्याचे मला माझ्या अभ्यासात जाणवले. त्यामुळे गुरुजींच्या विचारांवर समाजोपयोगी कार्य होणे गरजेचे आहे. असे मला वाटते. 
- अमोल तेलपांडे, गोळवलकर गुरुजींची भूमिका साकारणारे अभिनेते. 
 

 

Web Title: Golwalkar Guruji's memorial is in bad condition