गोंदिया@ 41.2 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

गोंदिया - गत आठवडाभरापासून जिल्ह्यात उन्हाचे कमी-अधिक चटके बसत असताना बुधवारी (ता. 29) पारा 41.2 अंश सेल्सिअसवर पोहोचला. सकाळी दहा वाजतापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सूर्यकिरणे अंगाला झोंबत असल्याने वर्दळीच्या रस्त्यांवर अघोषित संचारबंदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक शीतपेयांकडे वळल्याचे दिसून आले. 

मार्च महिन्याच्या मध्यंतरी अवकाळी पावसाने हजेरी लावून काही प्रमाणात का होईना वातावरणात गारवा आणला होता. परंतु, गत आठवडाभरापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. 34 ते 38 अंश सेल्सिअसवर या कालावधीत तापमानाची दांडी झुलत होती. बुधवारी मात्र, तापमानाने चांगलाच कहर केला. या दिवशी दुपारी अडीचपर्यंत 41.2 अंश सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद करण्यात आली. आज दुपारी 12 नंतर शहरासह ग्रामीण भागातील वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसत होते. टोपी, गॉगल्स, दुपट्टा यांचा आसरा घेत अनेकजण आपली महत्त्वाची कामे उरकताना दिसून आले. सायंकाळी पाचनंतर शीतपेयांच्या दुकानांवर आबालवृद्ध गर्दी करत घशाला पडलेली कोरड शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. उन्हाच्या झळा बसत असल्याने कष्टकऱ्यांचे हाल होत आहेत. तथापि, वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेली असून, बहुतांश ठिकाणी पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले आहे. ग्रामीण भागात भारनियमन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मार्च महिन्याच्या शेवटी चाळिशी पार केलेला पारा एप्रिल व मे महिन्यात आणखी भडकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. 

पाणीटंचाईची समस्या 
वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल जात आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल्स आटल्यागत स्थितीत आहेत. नळांना पुरेसे पाणी येत नसल्याची ओरड आहे. शहरातील शास्त्री वॉर्ड, आंबेडकर वॉर्ड, रेलटोली परिसर आदींसह बहुतांश ठिकाणी आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: gondia @ 41.2