गोंदिया : वीज पडून घरे गोठ्यांना आग; १४ लाख ४५ हजारांचे नुकसान

वीज कोसळून दोन घरे आणि सात गोठ्यांना लागली आग
Agriculture loss
Agriculture loss sakal

आमगाव : वादळवारा अन् आलेल्या पावसात वीज कोसळून नंगपुरा येथील दोन घरे आणि सात गोठ्यांना आग लागली. शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकूण नऊ जणांचे १४ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ऐन खरिपाच्या हंगामात गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, धानाची पोती जळून खाक झाल्याने पीडित शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

शुक्रवार, १७ जून रोजी दिवसभर ऊन तापत असताना रात्री साडेदहाच्या नंतर आमगाव, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोंदियासह अन्य काही तालुक्यांत तुरळक पावसाने हजेरी लावली. दहा ते पंधरा मिनीटे पाऊस पडला. त्यानंतर, आमगाव तालुक्यात शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वादळवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

नंगपुरा येथे दोन घरे व सात गोठ्यांवर वीज पडली. त्यामुळे लागलेल्या आगीत घरे व गोठे जळून खाक झाले. पुरण लोटू टेंभरे यांचा गोठा जळून ८० हजार रुपयांचे नुकसान, मोरध्वज कुंवरलाल टेंभरे यांचा गोठा जळून एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान, रंजित कुंवरलाल टेंभरे यांचा गोठा जळून एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान, खुमराज चंदूलाल टेंभरे यांचे घर जळून एक लाख ८० हजार रुपयांचे नुकसान, नारायण चंदूलाल टेंभरे यांचे घर जळून दोन लाख ६० हजार रुपयांचे नुकसान, दशरथ बाबूलाल टेंभरे यांचा गोठा जळून दोन लाख २० हजार रुपयांचे नुकसान, मुकेश खुमराज टेंभरे यांचा गोठा जळून एक लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान, हेमंत खुमराज टेंभरे यांचा गोठा जळून एक लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान तसेच संजय कुंवरलाल टेंभरे यांचा गोठा जळून एक लाख २५ हजार रुपयांचे नुकसान असे एकूण १४ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

घरे आणि गोठ्यातील साहित्य, धानाची पोती यात जळून खाक झाले. आगीची तिव्रता लक्षात घेऊन गोंदियाच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले होते. परंतु, तोपर्यंत आगीने सर्व साहित्य कवेत घेतले होते. तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला असून, झालेल्या नुकसानाची माहिती तहसील कार्यालयाला दिली आहे. दरम्यान, ऐन खरिपाच्या तोंडावर ही आपत्ती आेढवल्याने पीडित शेतकरी चिंतेत सापडले आहेत. शासनाने पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

सहा शेळ्यांचाही होरपळून मृत्यू

वीज पडून गोठ्याला लागलेल्या आगीत हेमंत टेंभरे यांच्या मालकीच्या सहा शेळ्यांचाही होरपळून मृत्यू झाला. गोठ्यातील शेतीपयोगी साहित्यांसह धानाची पोतीदेखील जळालीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com