गोंदिया पालिकेने शहर स्वच्छतेकडे लक्ष देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

गोंदिया : शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दरम्यान, नगरपालिकेने त्वरित घाणीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी शहरवासींनी केली आहे.

गोंदिया : स्वच्छ शहर, सुंदर शहर संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात आले आहे. परंतु, प्रशासनाकडून स्वच्छतेला बगल दिल्याचे दिसून येते. प्रत्येक वर्षी नागरिकांकडून नियमित करवसुली केली जाते. परंतु, सुरळीत सेवा देण्यात पालिका अपयशी ठरत आहे. शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसतात. परिसरात घाण पसरलेली आहे. नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
विशेष म्हणजे, शहरातील घनकचरा गोळा करण्याकरिता "ओला कचरा, सुका कचरा' पेट्या तसेच कंटेनर ठेवण्यात आले आहेत. तेथील घाणीकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. यापूर्वी लोखंडी कंटेनर ठेवण्यात आले होते; परंतु, कंटेनर भंगारात गेल्याने परिसरात उघड्यावर कचरा टाकला जातो. त्यानंतर सिमेंटच्या टाक्‍यात कचरा टाकला जात होता. त्यांची जागा फिरत्या गाड्यांनी घेतली. बहुतांश वसाहतींमध्ये फिरत्या गाड्या पोहोचत नाही, अशी ओरड नागरिक करतात. येथील रेल्वेस्थानक, बसस्थानक, शासकीय रुग्णालय व बाजारपेठ परिसरात घाणीचे साम्राज्य असून, आजाराची लागण आहे. नगरपालिकेने लक्ष देऊन घाणीची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
एचडीएफसी बॅंक, प्रभू मार्गावर ढिगारे
गोंदिया शहर ठाण्यालगतच्या एचडीएफसी बॅंकेजवळ, बाई गंगाबाई रुग्णालयाच्या गेटसमोर, रेल्वेस्थानकलगतचे प्रभू मार्ग आदी ठिकाणांसह गल्लोगल्ली कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत. तेथील कचरा अवकाळी पावसाने कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, लक्ष देणे गरजेचे आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia Municipality Demands Attention To City Cleanliness