गोंदिया : मित्रच मित्राचा वैरी होतो तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

- मित्रानेच केला अल्पवयीन मित्राचा खून
- धारधार शस्त्राने घातले मानेवर घाव
- जुन्या वादातून घडला थरार
- पोलिसांनी केला गुन्हा दाखल

गोंदिया : शहर पोळिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मनोहर चौकात एका मित्राची दुसऱ्या मित्रानेच धारदार चाकूने गळ्यावर वार करून हत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता. 9) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. कान्हा शर्मा (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे. मैत्रीच्या नात्याला काळिमा फासण्याचे कृत्य घडल्याने शहरात विविध चर्चांना ऊत आला आहे.

शनिवारी रात्री आठच्या सुमारास कान्हा हा चायनीजच्या ठेल्यावर नाश्‍ता करीत होता. दरम्यान, तो बेसावध असतानाच अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी धारदार चाकूने त्याच्यावर वार केले. यात तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक नार्वेकर यांनी घटनास्थळ गाठून जखमीला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविले.

दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेतील मृत कान्हासह आरोपीही अल्पवयीन असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी गोंदियात दहीहंडीच्या दिवशी या दोघांत मारहाण झाली होती. त्या वादाचा सूड घेण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी गोंदिया पोलिस तपास करीत आहेत.

शहरातील गुन्हेगारीत वाढ
गेल्या काही दिवसांमध्ये शहरात खून, दरोडे, मारामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्ह्यांमुळे "पोलिस खाते सुस्त आणि नागरिक त्रस्त' अशी परिस्थिती शहराची झाली असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याला आळा घालण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शहरातील विविध भागात घडत असलेल्या स्त्री अत्याचार, अपहरण, खून, मारामाऱ्या, घरफोडीचे प्रकार पाहता गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

अल्पवयींनामध्ये खुन्नस
या घटनेमध्ये मृत आणि मारेकरी हे दोन्ही अल्पवयीन आहेत. मित्राची चक्क हत्या करण्याचे धाडस आश्‍चर्यजनक आहे. गुन्हेगारीचे बदलते स्वरू पाहता हल्ली अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. गरिबी, पैशाची चणचण, व्यसन, आजूबाजूच्या लोकांच्या श्रीमंतीचे राहणीमान, मोबाईल, टॅब यासारख्या वस्तूंचे आकर्षण इत्यादी कारणांमुळे ही मुले गुन्हेगारीकडे आकर्षित होत आहेत.
वाईट संगत, पालकांचे मुलांवर लक्ष नसणे हेसुद्धा अशा घटनांमागील महत्त्वाचे कारण आहे. गोंदिया शहरात अलीकडे बालगुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उदयास येत असून त्याकडे पोलिस विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gondia: When a friend becomes an enemy of a friend