महिला सरपंचाने का ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप...वाचा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

ग्रामसेविकेची बदली व्हावी, म्हणून बहुतांश सरपंच धरणे, आंदोलने, उपोषण करताना आपण पाहिले आहे. मात्र, शिरोली येथे वेगळेच प्रकरण घडले. ग्रामसेविकेची बदली थांबविण्यासाठी चक्क सरपंचाने ग्रामसेवक कक्षाला सोमवारी कुलूप ठोकले. त्यामुळे पदभार स्वीकारण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या ग्रामसेविकेला खाली हाताने परतावे लागले.

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : शिरोली ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेविका म्हणून कु. एल. जी. मसराम गेल्या दीड वर्षांपासून कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी वाजवीपेक्षा जास्त घरकर, पाणीकर घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. तसेच या प्रकरणी पंचायत समितीमध्ये घमासान झाले होते. त्यानंतर ग्रामसेविका मसराम यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी ग्रामसेविका कांबळे यांची नेमणूक करण्यात आली. 

सरपंच पौर्णिमा रमेश ताडाम यांनी सोमवारी (ता. 6) दुपारी एक वाजता ग्रामसेवक कक्षाला कुलूप ठोकले. नंतर गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन ग्रामसेविकेची बदली थांबविण्याची विनंती केली; अन्यथा पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण करू, असे पत्रही दिले. या पत्रावर 85 नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल केला सादर 

दरम्यान, विस्तार अधिकारी अनुप भावे यांनी शिरोली ग्रामपंचायतीला भेट दिली असता ग्रामसेवक कक्ष बंद असल्याचे लक्षात आले. त्यांनी या घटनेचा पंचनामा करून गटविकास अधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला. 

पंचायत समिती प्रशासनावर ग्रामसेवक भारी 

तालुक्‍यातील येगाव जानवा तथा शिरोली, माहुरकुडा ग्रामपंचायतींच्या दोन्ही महिला ग्रामसेविकांवर अकार्यक्षमतेचा व कामात दिरंगाई करण्याचा ठपका ठेवत व वारंवार येणाऱ्या तक्रारींची गंभीर दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने 22 नोव्हेंबर रोजीच दोन्ही ग्रामसेविकांचे बदलीचे आदेश काढले. 

हे कसं शक्‍य आहे? वाचा : ...आता रेल्वेतही गुंडाराज 

पदभार सोपविण्याचा चार्ज दिला नाही 

अहवाल पंचायत समितीला सादर करण्याचे सांगितले; मात्र पावणेदोन महिन्यांच्या कालावधीत दोन्ही ग्रामसेविकांनी एकमेकाला पदभार सोपविण्याचा चार्ज दिला नसल्याने मोठा घोळ निर्माण झाला. बदलीच्या संदर्भात पंचायत समिती प्रशासन निद्रावस्थेत होते का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या घटनेवरून तालुक्‍यातील ग्रामसेवक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर भारी पडत असल्याचे दिसून येते.

कसं काय बुवा? : सांगा कसे जगायचे? आठ महिन्यांपासून खाण्याचेही वांधे

बदलीचे कारण कळले नाही 
ग्रामसेविका मसराम यांच्याकडून ग्रामपंचायतीला कसलाही त्रास नाही. गाव विकासाची कामे सर्व व्यवस्थित सुरू आहेत. झालेली बदली ही शासकीय नसून, अन्यायकारक आहे. बदलीचे मूळ कारण कळले नाही. त्यामुळे ही बदली थांबविण्यात यावी, अशी आपली मागणी आहे. 
- पौर्णिमा ताडाम, सरपंच, शिरोली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gondia : women sarpanch lock on GramPanchayat