गोंडवाना विद्यापीठात वर्षभर साजरा होणार दशमानोत्सव

Gondwana-university
Gondwana-university

गडचिरोली : जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठ दहाव्या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्त संपूर्ण वर्षभर दशमानोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यापीठ अनेक शैक्षणिक, सामाजिक, लोकोपयोगी कार्यक्रम राबविणार असून या दशमानोत्सवाचे उद्‌घाटन शनिवारी (ता.७) होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी शुक्रवारी (ता. ६) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेला कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव डॉ. ईश्‍वर मोहुर्ले उपस्थित होते. या उपक्रमाविषयी माहिती देताना कुलगुरू प्रा. वरखेडी म्हणाले की, गोंडवाना विद्यापीठाने दहाव्या वर्षात पदार्पण केल्यानिमित्त हे वर्ष दशमानोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. तसेच संचयन केंद्राचे (डाटा सेंटर) उद्‌घाटनही करण्यात येणार आहे. याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० याबाबत समाजातील विविध घटकांत जागरूकता निर्माण करण्याकरिता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

विद्यापीठाच्या दशमानोत्सव वर्षानिमित्त वर्षभरात प्रत्येक महिन्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांना आमंत्रित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विद्यापीठात गांधीजींच्या जीवनमूल्यांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांच्या नावाने ‘कमवा व शिका’ योजना राबविली जाणार आहे. तसेच या ‘कमवा व शिका’ योजनेची पुनर्रचना करून गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. 

कर्मयोगी बाबा आमटे यांच्या नावाने उन्नत ग्राम अभियान या नावाने विद्यापीठ परिक्षेत्रातील पाच गावे दत्तक घेऊन त्या गावांमध्ये कर्मयोगी बाबा आमटे उन्नत ग्राम अभियान या नावाने योजना राबवून गावांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे उद्‌घाटन शनिवारी ऑनलाइन पद्धतीने होणार असून राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्‍यारी मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्रा. डी. पी. सिंह व कुलगुरू प्रा. वरखेडी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरील पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व पालकही उपस्थित राहणार आहेत.

सुंदर सुरुवात...

गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जबाबदारी घेताच कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीची सुंदर सुरुवात केली आहे. विद्यापीठ दहाव्या वर्षात पदार्पण करीत असताना हा सोहळा साजरा होणे आवश्‍यकच होते. पण, हा सोहळा केवळ एक मिरवण्याचा इव्हेंट ठरू नये, तर त्यातून शैक्षणिक, सामाजिक विकासात विद्यापीठाला योगदान देता यावे म्हणून त्यांनी हा उत्सवच वर्षभराचा करीत त्यात अनेक उपक्रम समाविष्ट केले आहेत. 

उन्नत ग्राम अभियानात चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्‍यातील महापांढरवाणी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील साल्हे, क्रिश्‍नार, कन्हाळटोला अशी अतिदुर्गम व विकासापासून कोसो दूर असलेली गावे निवडत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास घेतल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील कार्याचा अनुभव असलेले कुलगुरू वरखेडी यांनी या उत्सवाला दशमानोत्सव असे संस्कृत भाषेतील समर्पक नाव दिले आहे. या उत्सवाला सामाजिक संवेदनांची सोनेरी किनार दिल्यामुळे हा उपक्रम अधिक लक्षवेधक ठरणार आहे.
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com