सुखदवार्ता :  वनरक्षकाचे वृक्षप्रेम, स्वखर्चाने जगविली झाडे 

रविराज घुमे
शनिवार, 23 मे 2020

वनविभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या रोपवनात सागवान, कडुनिंब, सीताफळ, चिंच, खैर, आवळा आदी झाडांचा समावेश आहे. या कामाला रोपवन मजूर सुनील वानखेडे आणि नामदेव बागडे यांचे सहकार्य मिळाले.

सेवाग्राम (वर्धा) : काही वर्षांपासून आपल्याकडे वृक्षारोपणाचे मोठे फॅड आले आहे. पण वृक्षांचे संगोपन करण्याविषयी कायम अंधारच असतो. या वृत्तीला छेद देत वृक्षसंवर्धनाचे वेड लागलेल्या एका वनरक्षकाने तब्बल तीन हजार झाडे शासनाची मदत न घेता स्वखर्चाने जगविली आहे. सेवाग्राम बिटामधील मदनी शिवारातील ही सुखदवार्ता आहे. हा वनरक्षक झाडांना पाणी देण्यासह त्यांची सर्व प्रकारे निगा राखतो. त्याच्या निःस्वार्थ सेवेने ही सर्व झाडे बहरली आहेत. 

हे वाचा— रेल्वेच्या तिकीट खिडकीवर नगण्य गर्दी, दिवसभरात केवळ 130 तिकीटांची विक्री 

झाडे पाण्याअभावी उन्हाळ्यात वाळली 

शासनाने विविध योजनांतर्गत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वृक्षारोपण झाले. पण, संवर्धनाबाबत मात्र कोणतीच योजना अंमलात आली नाही. परिणामी, अनेक ठिकाणी लावलेली झाडे जागीच वाळली. मदनी (दिंदोडा) येथे वनविभागाच्या जमिनीवर 2017-18 मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणात लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी उन्हाळ्यात वाळू लागली. पाणी नसल्याने अनेक झाडे मृतप्राय झाली. याची खंत मनात असल्याने या बिटात रुजू होताच वनरक्षक धनराज मजरे यांनी ही झाडे जगविण्याचा निश्‍चय केला. यावेळी शासनाच्या निधीचा आणि देणगीचा विचार न करता स्वखर्चाने पाणी देत ही झाडे जगविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले आहे. 

हे वाचा— आता निसर्ग पर्यटनाला चालना देणारे नवे पर्यटन धोरण, स्थानिकांना मिळणार रोजगारही
 

चिंच, खैर, आवळा आदी झाडांचा समावेश 

वनविभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या रोपवनात सागवान, कडुनिंब, सीताफळ, चिंच, खैर, आवळा आदी झाडांचा समावेश आहे. या कामाला रोपवन मजूर सुनील वानखेडे आणि नामदेव बागडे यांचे सहकार्य मिळाले. या कार्याबद्दल वर्ध्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बनसोड, श्री. शिरापूरकर यांनी वनरक्षक धनराज मजरे, रोपवन मजूर सुनील वानखेडे, नामदेव बागडे यांचे अभिनंदन केले आहे. 

रिकाम्या बाटल्या आणल्या विकत

 या झाडांना पाणी देण्याकरिता वनरक्षक धनराज मजरे यांनी काही क्‍लृप्त्या अंमलात आणल्या. यात त्यांनी बाजारातून प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या विकत आणल्या. तब्बल तीन हजार बाटल्या कापून त्या झाडाखाली गाडल्या. या बाटल्यात ते दररोज पाणी भरतात. यामुळे येथे झाडांना पाण्याची कमतरता जाणवत नसल्याचे श्री. मजरे यांनी सांगितले. 

पाण्याचे नियोजन 

वनविभागाने मदनी येथील रोपवनाच्या 12 हेक्‍टर क्षेत्रामध्ये विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली. रोपवन करून त्यांची निगा राखण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. या झाडांना पाणी देण्याची कुठलीही व्यवस्था वनविभागाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे झाडांना पाणी द्यायचे कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला. यातूनच शेतातील वेस्टेज पाणी या झाडांना मिळेल, असे नियोजन केले. येथील एका खड्ड्यात हे पाणी साचल्यानंतर ते या झाडांना देण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news: The forest ranger's love of trees, trees saved at his own expense