गणपती बाप्पांना आज निरोप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

रामटेक  (जि.नागपूर):  गणेशोत्सव मोठ्या उत्साहात अंतिम टप्प्यात असून उत्सवमूर्तींचे विसर्जन होऊ लागले आहे. यावेळी पर्यावरणपूरक गणेशविसर्जन व्हावे, यासाठी नगर परिषद, पोलिस विभाग यांच्यासोबत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यादेखील काम करणार आहेत. 

रामटेक  (जि.नागपूर):  गणेशोत्सव मोठ्या उत्साहात अंतिम टप्प्यात असून उत्सवमूर्तींचे विसर्जन होऊ लागले आहे. यावेळी पर्यावरणपूरक गणेशविसर्जन व्हावे, यासाठी नगर परिषद, पोलिस विभाग यांच्यासोबत तनिष्का व्यासपीठाच्या सदस्यादेखील काम करणार आहेत. 
तनिष्का व्यासपीठ शीतलवाडी गटाच्या समन्वयक, माजी सरपंच योगीता गायकवाड, सदस्य तथा खैरी बिजेवाड्याच्या सरपंच ऊर्मिला खुडसाव, लता क्षीरसागर, स्नेहा चौरे, अरुणा मेश्राम, शबाना शेख आणि इतर सदस्यांनी न. प. मुख्याधिकारी स्वरूप खारगे, ठाणेदार दिलीप ठाकूर यांना एक निवेदन देऊन पर्यावरणपूरक गणेशविसर्जनासाठी सहकार्य करू देण्याची विनंती केली. ठाणेदार दिलीप ठाकूर आणि मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी अतिशय आनंदाने तनिष्कांची विनंती मान्य केली. रामटेक, शीतलवाडी येथील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन मुख्यत्वे राखी तलाव येथे करण्यात येते. दरवर्षी येथे कृत्रिम हौद नगर परिषदेद्वारे निर्माण करण्यात येतो. त्याचप्रमाणे निर्माल्य संकलनासाठी "निर्माल्य कलश'देखील ठेवलेले असतात. मात्र, तरीही अनेक जण तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याबरोबरच निर्माल्यदेखील तलावातच विसर्जन करतात. त्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होते. पाण्यातील जलचरांवर या प्रदूषणाचा विपरित परिणाम होतो. कित्येकदा जलचरांना प्राणासही मुकावे लागते. पाण्याचे स्रोत खराब होऊ नयेत म्हणून किती "द्रावीडी प्राणायाम' करावे लागतात म्हणूनच तनिष्कांनी पर्यावरणपूरक गणेशविसर्जन व्हावे यासाठी भाविकांना समजावून सांगून आणि जबाबदारीची जाणीव म्हणून उत्सवमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदातच व्हावे व निर्माल्य "निर्माल्य कलशातच' विसर्जित व्हावे यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. त्याप्रमाणे तनिष्कांनी मुख्याधिकारी व ठाणेदार यांची भेट घेतली. याचप्रमाणे ग्रामपंचायत खैरी बिजेवाड्याच्या सरपंच व तनिष्का ऊर्मिला खुडसाव व ग्रामपंचायत सदस्य नितीन बंडीवार यांनी या उपक्रमाला हिरवी झेंडी देऊन ते स्वतःसुद्धा हा उपक्रम त्यांच्या हद्दीतील तलावाचे ठिकाणी राबवणार आहेत. भाविकांना एका फ्लेक्‍सद्वारे उत्सवमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात व निर्माल्य कलशात विसर्जित करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमात तनिष्कांसोबत "वुइ केअर ग्रुप'देखील सहभागी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goodbye to Ganapati Bapas today