गावठाणात पुनर्वसनासाठी नदीपात्रात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

वेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या "बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे.

वेलतूर (जि. नागपूर) - गोसे खुर्द धरणाच्या "बॅक वॉटर'मुळे प्रभावित गावालगतच्या आमनदीच्या पात्रात टेकेपारवासींनी गुरुवारपासून जलआंदोलनाला सुरवात केली. प्रशासनाचा धिक्‍कार करीत ग्रामस्थांनी आमनदी पात्रात रात्रीपासून मुलांबाळांसह आंदोलनाचे बिगुल फुंकले आहे.

गावाचे सर्वेक्षण अंदाजे 21 वर्षांपूर्वी झाले होते. तेव्हा गावात 167 कुटुंबे होती. आता ती वाढून 246 झाली आहेत. तरीही जमिनीच्या आखणीसाठी जुनीच यादी का? असा आंदोलनकर्त्या गावकऱ्यांचा प्रश्‍न आहे. गावात आधीपासून असलेल्या जुन्याच कुटुंबांना भूखंड मिळालेत, मग वाढीव कुटुंबांचे काय? शेती गेली, रोजगार गेला, राहते घर धरणाच्या पाण्यात गेले अन्‌ हाती काहीच नाही, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्‍त केल्या. मागील 20 वर्षांपासून योग्य पुनर्वसनासाठी त्यांचा निकराचा लढा सुरू आहे. गावकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हरदोली, बोरी, रुयाड, पोहरा, आंभोरा, मालोदा, फेगड, जीवनापूर, नवेगाव, सिर्सी येथील प्रकल्पग्रस्तांनी भेट घेऊन आंदोलनस्थळी हजेरी लावली. आंदोलनामुळे दोनशे पोलिसांनी आंदोलनस्थळ व गावाला वेढा घातला आहे.

चूल पेटली नाही
पोलिस कारवाईच्या भीतीने आंदोलक काल रात्रीपासूनच गुपचूप आंदोलनस्थळी पोचले. त्यांच्यासोबत कुटुंबीयही होते. त्यामुळे गावात चूल पेटली नाही. कामासाठी बाहेरगावी गेलेले गावकरीही दुपारपासून गावात परतण्यास सुरवात झाली. परिसरातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार व पालकमंत्र्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे.

गावाचे योग्य पुनर्वसन व्हावे, या मागणीसाठी 20 वर्षांपासून सुरू असलेला तिढा लवकर संपायला हवा. गावालगतच्या महामार्गावर आम्हाला रोजगाराचे साधन उपलब्ध न झाल्यास हा लढा सुरूच राहील.
- सुनील लांजेवार, आंदोलनकर्ता युवक

Web Title: Gose Khurd Dam Affected Rehabilitation Issue Agitation