गोसेखुर्दच्या कंत्राटदारांना काम बंद करण्याचे निर्देश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठपका ठेवलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या 81 निविदा रद्द करण्याचा निर्णय राज्य  सरकारने दोन महिन्यांपूर्वीच घेतला होता. त्यानंतर गुरुवारी सिंचन विभागाने या प्रकल्पाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काम बंद करण्याचे पत्र दिले. यामुळे कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली आहे. 

दोन महिन्यांपूर्वीच राज्य शासनाने गोसेखुर्द प्रकल्पातील 81 निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यातून डाव्या कालव्यातील दोन निविदा वगळल्या. या व्यतिरिक्त उर्वरित 79 निविदा रद्द केल्या. परंतु, कंत्राटदारांना कामे बंद करण्याचे कुठले पत्र किंवा सूचना सिंचन विभागाकडून मिळाली नव्हती. परंतु, या प्रकरणाला घेऊन काही जणांनी आक्षेप घेत जलसंपदामंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सिंचन विभागाने एसीबीने ठपका ठेवलेल्या कामाच्या निविदा रद्द करीत कामे बंद करण्याचे पत्र कंत्राटदारांस दिले. त्यांच्या हाती हे पत्र पडताच खळबळ उडाली. अनेकांनी गुरुवारी सिंचन भवन गाठत हे शक्‍य आहे का? आतापर्यंत झालेल्या कामाचे काय? असे प्रश्‍नदेखील काही कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केल्याची माहिती आहे. याविरोधात काही कंत्राटदारांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली असल्याची माहिती आहे. 

निविदा काढण्याचा मार्ग मोकळा 
गोसेखुर्द प्रकल्पाच्या निविदा रद्द केल्यानंतर सिंचन विभागाने कंत्राटदारांना कामे बंद करण्याचे पत्र दिले, त्यामुळे आता प्रकल्पाची  उर्वरित कामे करण्याची निविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी गोसेखुर्दच्या कामालादेखील आता गती मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

Web Title: Gosekhurda instructions to the contractors stopped work