गोसेखुर्दचे पाणी आता घोडाझरी तलावात : अर्थमंत्री मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

नागभीड/तळोधी बा. (जि. चंद्रपूर) : गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या किलोमीटर 34 च्या ठिकाणी घोडाझरी मध्यम प्रकल्पाकरिता लागणाऱ्या 20 दलघमी पाण्याकरिता उपसा सिंचन योजनेसाठी 86.56 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज, बुधवारी मंत्रालयात याबाबत आयोजित बैठकीत दिले.

नागभीड/तळोधी बा. (जि. चंद्रपूर) : गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या किलोमीटर 34 च्या ठिकाणी घोडाझरी मध्यम प्रकल्पाकरिता लागणाऱ्या 20 दलघमी पाण्याकरिता उपसा सिंचन योजनेसाठी 86.56 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्याचे निर्देश अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज, बुधवारी मंत्रालयात याबाबत आयोजित बैठकीत दिले.
बैठकीला मंत्री जयकुमार रावल, खासदार अशोक नेते, आमदार बंटी भांगडिया, जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे, घोडाझरी संघर्ष समितीचे संयोजक ईश्‍वरकुमार कामडी, रमेश पाटील बोरकर, विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश कुर्वे, गोसेखुर्द प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता शेख, घोडाझरी कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता मंडवार, जलसंपदा विभागाचे उपसचिव धरणे उपस्थित होते.
नागभीड तालुक्‍यातील घोडाझरी मध्यम प्रकल्पाची सिंचन क्षमता 3846 हेक्‍टर असून, हा तलाव ब्रिटिशकालीन आहे. हा तलाव 1923 मध्ये पूर्ण झालेला आहे. या तलावातून सध्या 5881 हेक्‍टर क्षेत्रास सिंचनाची मागणी असून सदर तलावावर ताण निर्माण होत असल्यामुळे घोडाझरी संघर्ष समितीने गोसेखुर्द प्रकल्पातून उपसा करून घोडाझरी तलावात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. ही प्रलंबित मागणी पूर्ण करावी यासाठी समितीतर्फे 27 ऑगस्ट रोजी जलसमाधी घेण्याचा इशारा देण्यात आला होता. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मागणीची त्वरित दखल घेत बैठकीचे आयोजन केले होते.
गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या किमी 34 च्या ठिकाणी घोडाझरी मध्यम प्रकल्पाकरिता लागणाऱ्या 20 दलघमी पाण्याकरिता उपसा सिंचन योजनेसाठी प्राथमिक अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत गोसेखुर्द उजव्या कालव्यावरून 22 मी. ची उचल करून जवळपास 18 किमी लांबीच्या उर्ध्वनलिकेद्वारे घोडाझरी तलावामध्ये पाणी सोडता येईल. सदर उपसा सिंचन योजनेच्या पंपगृह, पंपसामग्री, स्वीचयार्ड, उर्ध्वनलिका आदी तयार करण्याकरिता 86.56 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी संबंधितांना दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gosekhurd's water now in Ghodzhari Pond: Finance Minister Mungantiwar