गरज ८० लाखांची असताना २९ लाखांवर बोळवण

Ayurved
Ayurved

नागपूर - आयुर्वेद वैद्यकशास्त्र प्राचीन असून व्याधी बरी करणारे शास्त्र आहे. आयुर्वेद ही जगण्याची जीवनशैली असल्यानेच आयुर्वेदाचा शास्त्रशुद्ध प्रचार ‘आयुष’ मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारने सुरू केला. राज्य शासनानेही आयुर्वेदाचा प्रसार करण्याची घोषणा केली, परंतु ही घोषणा तर हवेत विरली. मात्र शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात दरवर्षी मिळणारे बजेटही देण्यात राज्य शासन अपयशी ठरले. वार्षिक अंदाजपत्रकानुसार वर्षाला ८० लाखांची गरज असताना अवघे २९ लाख रुपये देऊन बोळवण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  

एकीकडे केंद्र सरकारतर्फे आरोग्यासाठी असलेल्या अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी २० टक्के निधी आयुर्वेदासाठी राखीव करण्याचे धोरण ठरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांना उपेक्षित ठेवण्यात येत आहे. दरवर्षी ७० ते ८० लाख रुपयांतून वनस्पती औषधोपचारावर खर्च होतात. याशिवाय नेत्ररोगासंबंधित काही साहित्य खरेदी करावे लागते. मात्र राज्य शासनातर्फे केवळ २९ लाख रुपये देण्यात आल्यामुळे उर्वरित निधी न मिळाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात लाभ देता येत नसल्याची ओरड खुद्द शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, परिचारिकांसहित इतर कर्मचाऱ्यांची असून सारेच खासगीत चर्चा करतात. मात्र उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. सारेच मूग गिळून असल्यामुळेच दरवर्षी संपूर्ण बजेट मिळत नाही. 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात दर दिवसाला ५०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. पक्षघात, नेत्र तसेच इतर आजारांचे मोठ्या प्रमाणात रुग्ण येथे येतात. विशेष असे की, मालिश करण्यासाठी रुग्णांची येथे गर्दी होते, परंतु वार्षिक अंदाजपत्रकात कपात केल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाकडून उपचार करताना रुग्णांची संख्या लक्षात घेण्यात येत असल्याची चर्चा खासगीत सुरू आहे. एकीकडे नागपूर आयुर्वेदाचे हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न लोकप्रतिनिधींकडून दाखवले जात असताना दुसरीकडे आवश्‍यक असलेले बजेट दिले जात नाही.

१७ लाख रुपये उधारी अदा केली 
आयुष पॅथीचे विद्यापीठ सुरू करण्याचे संकेत सरकारकडून दिले जात असताना अत्यल्प निधी देऊन बोळवण केली जाते. यावर्षी ८० लाखांपैकी २९ लाख रुपये दिले. महाविद्यालयाच्या तिजोरीत २९ लाख रुपयांचा निधी जमा झाल्यानंतर सर्वांत आधी पुरवठादारांची मागील वर्षाची १७ लाख रुपयांची उधारी अदा केली. यामुळे अवघ्या १२ लाख रुपयांत महाविद्यालयाचा कारभार कसा चालवायचा, हा प्रश्‍न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com