#NagpurWinterSession : सरकारने शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला : फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

सत्तेत येण्याआधी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच सरकारने पुरणवणी मागण्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, आता हेच सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केला असल्याचा आरोप विराधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

 

 

पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिकत्व सुधारणा विधेयकावरून हिवाळी अधिवेशनाचे वातावरण तापले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी सकाळीच आक्रमक पवित्रा घेत विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सभागृहात देखील विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. 

ठळक बातमी -  #NagpurWinterSession :  दिलेले आश्‍वासन पूर्ण करा

सत्तेत येण्याआधी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत येताच सरकारने पुरणवणी मागण्यांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकाने केंद्र सरकारच्या जीवावर हे आश्‍वास दिले होते का? आता केंद्राकडे चेंड टोलविण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारकडून सुरू असल्याची टीका फडणवीसांनी मंगळवारी केली. 

आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्यांना स्वत:च्या बळावर मदत केली होती. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यात असमर्थ असल्याचे दिसत असून, त्यांनी शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याचे फडणवीस म्हणाले. अशा सरकाने खुर्ची खाली करावी अशी मागणीही त्यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना केली. 

हेही वाचा -  #NagpurWinterSession : रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

सामनामध्ये प्रकाशित झाले होते आश्‍वासनाचे वृत्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. विरोधी पक्षाच्या आमदारांनी परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आंदोलन केले. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली. 

भाजप-सेनेच्या आमदारांत धक्काबुक्की, कामकाज तहकुब

विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. तसेच अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर झळकावले व घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेनेचे संजय रायमूलकर यांनी बॅनर ओढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. भाजपचे आशीष शेलार, गिरीश महाजन आणि शिवसेनेचे भास्कर जाधव, संजय राठोड यांनी मध्यस्ती केली. दोनवेळा कामकाज तहकुब केल्यानंतर कामाला सुरुवात झाली. मात्र, वाद शांत होत नसल्याने अध्यक्ष नाना पटोले यांनी दिवसभराचे कामकाज तहकुब केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government betrayed the farmers