शासनाला कापूस मिळणे कठीण

Cotton
Cotton

अमरावती - दिवाळी आटोपल्यानंतरही शासकीय खरेदीचा मुहूर्त निघालेला नाही. खुल्या बाजारात हमीदरापेक्षा पाचशे रुपये अधिक मिळत असल्याने शेतकरी समाधानी असून त्याला शासकीय खरेदी केंद्राचे आकर्षण नसल्याचे दिसत आहे. मात्र, उत्पादनाची घसरलेली सरासरी बघता वधारलेला भावही त्याच्या जखमेवर मीठ चोळणाराच ठरू लागला आहे.  

यंदा दोन ते तीन क्विंटल प्रतिएकर सरासरी कपाशीचे पीक आहे. अमरावतीच्या खासगी बाजारात कापसाला ५ हजार ८५९ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यंदाच्या खरीप हंगामात सरासरी पेरणी क्षेत्रापैकी कापसाची पेरणी अधिक झाली. जिल्ह्यात नेहमीच्या कापसाच्या पेऱ्याखालील १ लाख ९४ हजार ९६१ हेक्‍टर क्षेत्राऐवजी यंदा २ लाख ९ हजार ५८३ हेक्‍टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली. खंडित पावसाळा, पर्याप्त पाण्याची वानवा, जमिनीतील कोरडेपणा व रोगांचे आक्रमण यामुळे उत्पादनाची सरासरी घसरली आहे. कापूस उत्पादक पट्ट्यात कापसाची वेचणी सुरू झालेली आहे. राज्यात कुठेही कापसाचे शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. व्यापाऱ्यांनी दसऱ्यानंतर खासगी केंद्र सुरू करून मुहूर्त साधला. आवक कमी मात्र जागतिक पातळीवर मागणी अधिक, यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना बाजारपेठेतील मार्ग मोकळा केला.
दरवर्षी सीसीआय कापूस खरेदी करते. पणन महासंघ त्यांच्यासाठी अभिकर्ता म्हणून काम करतो. सीसीआयच्या निकषामुळे खरेदीदार फारसे उत्साही नाहीत. व्यापाऱ्यांनी संधी साधून खरेदी सुरू केली. शासनाने लांब धाग्यासाठी ५४५० रुपये व मध्यमसाठी ५१५० रुपये प्रतिक्विंटल हमीदर जाहीर केला आहे.

व्यापाऱ्यांनी सद्यस्थितीत कापसाला ५५०० ते ६००० रुपये क्विंटल दर दिला आहे. अमरावतीच्या बाजारात ५ हजार ८५९ रुपये भाव मिळाला आहे.

भाव वधारण्याची शक्‍यता
यंदा उत्पादनाची सरासरी कमी राहणार असली तरी दर्जा चांगला आहे. खुल्या बाजारात  व्यापाऱ्यांनी हमीदरापेक्षा अधिक भाव देत खरेदी सुरू केल्याने शेतकरी त्याकडे आकर्षित झाला आहे. आगामी दिवसांत भाव वधारण्याची शक्‍यता असून सात हजार रुपयांपर्यंत भाव जातील,  असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी साठवणूक करीत असून शासनाला कापूस मिळेल की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com