यंदा एक महिन्यापूर्वीच कपाशीची उलंगवाडी, शासकीय केंद्रे पडताहेत ओस

कृष्णा लोखंडे
Sunday, 31 January 2021

पावसाने यंदा समतोल राखला नाही. अनियमित व प्रमाणापेक्षा अधिक झालेल्या पावसाने विविध रोगांचे आक्रमण कपाशीवर झाले. बोंडसड हा यंदा नव्याने आलेल्या रोगाने कापसाची पुरती वाताहत केली.

अमरावती : शासनाने जाहीर केलेल्या हमीदरापेक्षा खुल्या बाजारात भाव अधिक व चुकारे नगदी मिळू लागल्याने कापूस खरेदीसाठी सुरू झालेले शासकीय केंद्रे ओस पडू लागली आहेत. आधीच उत्पादन घटले असताना व आवक कमी असताना शेतकऱ्यांचा मोर्चा खासगी बाजारात वळल्याने शासकीय केंद्रे यंदा लवकर बंद करण्याची वेळ पणन महासंघावर आली आहे. फारफार तर १५ फेब्रुवारीपर्यंत हंगाम चालू शकेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. 

हेही वाचा - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता...

यावर्षीच्या खरीप हंगामात कापसावर बोंडसड व बोंडअळीचे जोरदार आक्रमण झाले. बोंडसडीने कापसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असून प्रतवारीही घसरली आहे. २७ नोव्हेंबरपासून शासनाने कापसाची शासकीय खरेदी सुरू केली. विदर्भ व मराठवाड्यातील २८ तालुक्‍यांत ५८ केंद्रे व १६४ जिनिंग सुरू करण्यात आले. राज्यात सरत्या खरीप हंगामात ४२ लाख ८६ हजार हेक्‍टर क्षेत्रात कापसाची पेरणी झाली. सरासरी ती २९ टक्के आहे. विदर्भ व मराठवाडा हा विभाग कापसाचा प्रमुख उत्पादक आहे. विदर्भातील नागपूर विभागात ६ लाख २७ हजार, तर अमरावती विभागात १० लाख ८१ हजार हेक्‍टर क्षेत्रात कापसाचा पेरा होता. तोच मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात १० लाख ३९ हजार व लातूर विभागात ४ लाख ६८ हजार हेक्‍टर क्षेत्रात पेरणी होती. 

हेही वाचा - नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच

पावसाने यंदा समतोल राखला नाही. अनियमित व प्रमाणापेक्षा अधिक झालेल्या पावसाने विविध रोगांचे आक्रमण कपाशीवर झाले. बोंडसड हा यंदा नव्याने आलेल्या रोगाने कापसाची पुरती वाताहत केली. त्यामुळे हेक्‍टरी उत्पादनावर मोठा परिणाम झाला. साधारणतः हेक्‍टरी सात क्विंटल सरासरी उत्पादकता कृषी विभागाने सांगितली आहे. त्यामुळे यंदा कापसाचे उत्पादन तुलनेने कमी झाले असल्याने बाजारातील आवक घसरली आहे. शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील ६० तालुक्‍यांत ५८ केंद्रे व १६४ फॅक्‍टरी सुरू केल्या. २७ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू करण्यात आली असून २८ डिसेंबरपर्यंत ३६ लाख ३१ हजार ९५४ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. कापसाचा हंगाम साधारणतः मार्च महिन्यातील अखेरपर्यंत म्हणजे होळीपर्यंत चालतो. यंदा कापसाची उलंगवाडी १५ फेब्रुवारीलाच होण्याचे संकेत असल्याचे पणन महासंघाचे अनंत देशमुख यांनी सांगितले. फारतर ती काही केंद्रांवर २५ फेब्रुवारीपर्यंत चालू शकेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला. 

हेही वाचा - ...अन् राज्यपाल कोश्यारींनी राज्य सरकारला खडसावले

खासगी खरेदी जोमात - 
शासनाने लांब धाग्याच्या कापसाला ५ हजार ८२५ तर मध्यम धाग्याच्या कापसाला ५ हजार ५१५ रुपये प्रतिक्विंटल भाव दिला आहे. खासगी केंद्रांवर हाच भाव चढ्या दरात आहेत. खासगी खरेदीदारांनी ५ हजार ८०० रुपये भाव दिल्याने शेतकरी मोठ्या संख्येने तिकडे वळले आहेत. शिवाय चुकारेही नगदी होऊ लागल्याने त्याचा परिणाम शासकीय केंद्रांवर पडू लागला आहे. त्यामुळे पणनने यंदा उलंगवाडी लवकर करण्याचा निर्णय घेतला आहे, असे अनंतकुमार देशमुख म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government cotton selling center closed in amravati