ऐकलं का? बारमधील मद्यसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाई होणार म्हणे...

government to do inspection of liquor shop stock
government to do inspection of liquor shop stock

वणी (जि. यवतमाळ) : कोरोनाच्या संकटामुळे शासनाने देशासह राज्यात लॉकडाउन लागू केले होते. गेल्या दोन महिन्यापासून मद्यविक्रीवर बंदी होती. आता शासनाने बिअर बार धारकांना सीलबंद दारू विक्रीची मुभा दिली आहे. तत्पूर्वी परमीट रूममधील दारूसाठा तपासण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाला दिले. त्यामुळे बंदी काळात अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्यांची धाकधूक वाढली आहे. दारूसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाईचा बडगा उगारल्या जाणार आहे.

मागील दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्यात मद्यविक्री बंद होती. त्यामुळे तळीरामांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. आपली तृष्णा भागविण्याकरिता हातभट्टीचा आधार घ्यावा लागला होता. तर काहींनी सॅनिटायझरचा वापर नशेकरिता करून आपला जीव गमावला. 11 मे रोजी राज्यशासनाने वाईन शॉप, देशी दारू दुकाने व बिअर शॉपी उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे बिअर बार धारकांनीसुद्घा सीलबंद दारू विकण्याची परवानगी शासनाकडे मागीतली होती. त्यान्वये शासनाने बिअर बारमधून सीलबंद बाटलीतून दारू विक्रीला परवानगी दिली आहे.

बार मालकांनासुद्धा वाईन शॉपप्रमाणे एमआरपी दराने दारू करावी लागणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग केल्या जात आहे. टाळेबंदीच्या काळात अनेक बार धारकांनी अवैधरीत्या दारूची विक्री केली होती. यामुळे वणीतील एका बिअर बारची अनुज्ञप्ती कायम स्वरूपी बंद करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला होता. मात्र अजूनही अनेक बिअर बार संशयाच्या भोवऱ्यात असल्याने वणी तालुक्‍यात असलेल्या 56 बिअर बारमध्ये असलेल्या मद्यसाठ्याची तपासणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सुरू केली आहे. यामध्ये तफावत आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे काही बार मालकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे.

एमआरपीनुसारच विक्रीचे निर्देश

सील बंद बाटलीतून मद्यविक्रीची परवानगी बार मालकांनी मागीतली होती. त्यानुसार बारमधून मद्यविक्रीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. मात्र, त्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत मद्यसाठ्याची तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे बारमधून एमआरपीनुसारच विक्री करावी लागणार आहे.

पितळ उघडे पडण्याची भीती

लॉकडाउनच्या काळात वणीसह जिल्हाभरातील मद्यविक्रेत्यांनी आपली चांदी करून घेतली. अव्वाच्या सव्वादराने दारू विक्री केली. त्यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊसही पडला. वणीतून चंद्रपूर जिल्ह्यात होणारी दारू तस्करी लपून राहिली नाही. या काळात बार मालकांनी बंदी असलेल्या जिल्ह्यातही दारू पुरविली. मद्यसाठ्याच्या तपासणीतून त्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती मद्यविक्रेत्यांना सतावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com