esakal | खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १८ हजार कोटींची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

government help to farmers before diwali in yavatmal

अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात 34 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल 49 हजार 256 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १८ हजार कोटींची मदत

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : यंदा गेल्या जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या हफ्त्यापोटी 18 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश सोमवारी (ता. ९)काढण्यात आले आहेत. त्यासोबतच घरांची पडझड व जनावरांचा मृत्यू झालेल्यांनाही ही शासकीय मदत दिली जाणार आहे.

अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात 34 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल 49 हजार 256 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे पेरणीमध्ये अनेकदा व्यत्यय आला. त्यातच पेरणी सुरू केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार व तिबार पेरणी करावी लागली. पेरण्या कशाबशा आटोपल्या असतानाच जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने थैमान घातले. त्यामुळे दारव्हा व नेर या तालुक्‍यांतील शेतपिके खरडून गेलीत. विविध तालुक्‍यांतील पिकांनादेखील फटका बसला. या संकटांतून शेतकरी बाहेर येत नाहीत व पिके जोमात असतानाच ऐन काढणीच्यावेळी सप्टेंबर व ऑक्‍टोबर या महिन्यांत पावसाने झोडपून काढले.

हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण...

संततधारेमुळे सोयाबीनला अक्षरक्षः कोंब फुटलेत, तर कापसाची बोंडेही सडली. कापूस व सोयाबीनसोबतच तूर, उडीद, मूग या शेतपिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने जून ते ऑगस्ट या कालावधीत नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. त्यात बाधित क्षेत्र दोन हजार 926 हेक्‍टर एवढे आहे. सप्टेंबर व ऑक्‍टोबर या महिन्यांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14 तालुक्यामधील शेतपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामध्ये 34 हजार हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टीमुळे 49 हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. प्रशासनाने 24 कोटी 27 लाख 43 हजार रुपयांचा मदतनिधी मागणीचा प्रस्ताव पाठविला होता. शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्याला 18 कोटी सहा लाख 28 हजारांचा मदतनिधी मिळाला आहे. पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड असले तरी मदतीमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - तिवसा नगरपंचायत निवडणूकीचे प्रभागाचे आरक्षण जाहीर; विद्यमान सदस्यांना बदलावे लागणार प्रभाग

अशी मिळणार मदत -
अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे, अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीसाठी दहा हजार रुपये प्रतिहेक्‍टरी व बहुवार्षिक़ पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार रुपये प्रतिहेक्‍टरी या दराने दोन हेक्‍टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे. 

प्रशासनाकडून 315 कोटींचा प्रस्ताव -
जिल्ह्यात पावसाने चार लाख 63 हजार 692 हेक्‍टरला फटका बसला आहे. प्रत्येक तालुक्‍यात सरासरी 30 हजार हेक्‍टरच्या जवळपास नुकसान झाले आहे. शेतपिकांचे पंचनामे करण्यात आलेत. त्यावेळी 315 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने शासनाला पाठविला आहे. दोन स्मरणपत्रही पाठविण्यात आलेली आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळावी, हा या मागचा उद्देश आहे. मात्र, सध्या तरी जिल्ह्याला अतिवृष्टीच्या भरपाईसाठी केवळ 18 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.