सरकारचे पैसे संपले; शिष्यवृत्ती मिळेना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

नागपूर : शहरासह राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना 2018-19 या वर्षाची शिष्यवृत्ती मिळालेली नाही. या प्रकाराने विद्यार्थी चिंतेत असून, महाविद्यालयांसमोरही आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र, सरकारकडून पैसे संपल्याचे कारण देत हात वर करण्यात येत आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, फार्मसी, पॉलिटेक्‍निक, हॉटेल मॅनेजमेंट आणि आर्किटेक्‍चर या तांत्रिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी "डीबीटी' (डायरेक्‍ट फंड ट्रान्सफर) योजना लागू करण्यात आली. मात्र, मागील वर्षी तांत्रिक कारण देत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले. आता "डीबीटी' योजना सुरळीत सुरू केली आहे. त्यासाठी तयार केलेल्या महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉगीन करावे लागते. त्यामुळे 2018-19 या वर्षाची शिष्यवृत्ती मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार 2018-19 मधील शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता फेब्रुवारी महिन्यात आला. मात्र, त्यामधील अनुदानही बऱ्याच महाविद्यालयांना मिळाले नाही. त्यामुळे महाविद्यालयात काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार देण्यास महाविद्यालये असमर्थ ठरली आहेत.
काही वर्षांपासून शिष्यवृत्ती वाटपात सरकारकडून करण्यात येत असलेल्या घोळामुळे बऱ्याच महाविद्यालयांवर आर्थिक संकट आले आहे. विशेष म्हणजे, अनेकदा तांत्रिक कारण देत शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे महाविद्यालये आर्थिक संकटात आहेत. याचा परिणाम थेट प्रवेशावर होत असल्याचे चित्र आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government money finished; not scholarships