विद्यार्थ्यांनो टेन्शन घेऊ नका! महाविद्यालयीन परीक्षा सुरळीत पार पाडणार; कोणी दिली ग्वाही वाचा

सुरेंद्र चापोरकर 
Tuesday, 15 September 2020

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आढावा बैठक विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते.

अमरावती : महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठांकडून परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षेबाबत साधनांची अडचण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व निर्धोक वातावरणात ऑफलाइन परीक्षेचे नियोजन प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येत आहे. शासन, प्रशासन व विद्यापीठ यांच्या समन्वयाने परीक्षा प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

अधिक माहितीसाठी - बारा दिवसांची चिमुकली गंभीर आजाराने ग्रासलेली अन् घरात अठरा विश्व दारिद्र्य, मग काय करणार ते मायबाप

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आढावा बैठक विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर आदी या वेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री. सामंत म्हणाले, की परीक्षा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, पूर्वतयारी व आवश्‍यक सहकार्य यासाठी राज्यातील सर्व विद्यापीठनिहाय आढावा बैठक घेतली जात आहे. या अनुषंगाने विद्यापीठासमोरील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याचाही प्रयत्न होत आहे. विद्यापीठांचे शासनस्तरावर जे-जे प्रलंबित प्रश्‍न आहेत, ते सर्वांच्या उपस्थितीत अशा आढाव्याद्वारे एकाच दिवसात सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठकीचेही नियोजन करण्यात येईल.

सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून सुमारे 70 हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यात 15 ते 25 सप्टेंबरदरम्यान प्रात्यक्षिक व 1 ते 26 ऑक्‍टोबरदरम्यान अंतिम परीक्षा होणार असून, मॉकटेस्टचाही अंतर्भाव असेल. परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर व्हावेत, यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. 

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत

90 ते 92 टक्‍के विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार असून, उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाइन सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती त्यांच्या महाविद्यालयाकडून 22 तारखेपर्यंत संकलित करून 25 तारखेपर्यंत विद्यापीठाला कळविण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून ऑफलाइन परीक्षाही घेतली जाईल, असे विद्यापीठाचे परीक्षा विभागप्रमुख श्री. देशमुख यांनी या वेळी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government will nicely organize college exams said state education minister