ग्रेस यांची ‘संध्याकाळ’ पाच दशकांनंतरही लख्ख !

नितीन नायगावकर
गुरुवार, 10 मे 2018

नागपूर - दुर्बोध, अनाकलनीय, आत्ममग्न अशा लाख उपमांनी ग्रेस यांच्या कवितांना  वेसण घालण्याचा प्रयत्न केला, पण पन्नास वर्षे उलटूनही त्यांच्या कवितेतील ‘संध्याकाळ’ वाचकांच्या हृदयात लख्ख आहे. ‘विकायला आज, निघालो मी व्यथा...जुनी माझी कथा, कोण घेई?’ असे ग्रेस यांनी लिहिले खरे. पण, त्यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा संग्रह आजही महाराष्ट्रात सर्वाधिक मागणी असलेल्या कवितासंग्रहांमध्ये गणला जातो. १० मे या ग्रेस यांच्या जन्मदिनी ‘संध्याकाळ’च्या आठवणींनाही उजाळा मिळाला. 

पॉप्युलर प्रकाशनने १९६७ मध्ये ग्रेस यांचा ‘संध्याकाळच्या कविता’ हा संग्रह प्रकाशित केला. ग्रेस यांचे हे पहिलेच पुस्तक. महाराष्ट्रातील साहित्य विश्‍वाने या कवीच्या पहिल्या-वहिल्या संग्रहाचे कसे स्वागत केले, याचे अनेक लोक साक्षीदार आहेत. मात्र, या संग्रहाने पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील वाचकांच्या मनात स्थान मिळवले.

एवढे की, आज पाच दशके लोटली तरी ‘संध्याकाळच्या कविता’ या संग्रहाचे पुनर्मुद्रण सातत्याने करावे लागत आहे. ग्रेस यांच्यातील ‘संध्यामग्न पुरुष’ ज्यांच्या वाट्याला आला, ते कायमचे त्यांचे चाहते झाले. रामदास भटकळ हे एक असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्या प्रेमाने ग्रेस स्वतः भारावले होते.

‘एखाद्या समृद्ध माणसासारखे माझ्या वाट्याला आले रामदास भटकळ’...असे ग्रेस यांनी ‘संध्याकाळच्या कविता’ या पुस्तकात सुरुवातीलाच लिहून ठेवले आहे. ‘मी साहित्यिक नाही. ग्रेस आणि माझ्यात कवी-प्रकाशक म्हणून नव्हे तर मैत्रीचे नाते होते’, असे रामदास भटकळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ग्रेस यांच्यावरील समीक्षेची पाच पुस्तके प्रकाशित करणारे विजय प्रकाशनचे सचिन उपाध्याय यांनीदेखील ‘संध्याकाळच्या कविता’ या संग्रहाचीच सर्वाधिक मागणी असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील रसिकांवर ग्रेस नावाचे असे काही गारुड आहे की, त्यांच्यावरील  समीक्षेच्या पुस्तकांनाही तेवढीच मागणी असते.

‘संध्याकाळच्या धूसर वातावरणात ग्रेसचे दुःख फिरून फिरून जन्म घेते. संध्याकाळीच ही वेदना पुनःपुन्हा जागी होते, कारण याच वेळी आत्मा एकटा होतो...याच वेळी तो स्वतःहून वाहणाऱ्या प्रवाहाच्या उगमापर्यंत जाऊ शकतो’... या  शब्दांत शिरीष पै यांनी ‘संध्याकाळच्या कविता’ या संग्रहाची समीक्षा केली होती. त्याची प्रचिती आजही येत आहे. 

‘संध्याकाळच्या कविता’ या संग्रहाचे सातत्याने पुनर्मुद्रण सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आणखी एक नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती हाती येईलच. पण, मला त्यांच्या चाहत्यांना ‘समग्र ग्रेस’ द्यायचा आहे. पण, फक्त कवितासंग्रहांमधील ग्रेस. अद्याप त्याची प्रस्तावना माझ्या हाती आली नाही. येत्या वर्षभरात हेही काम पूर्ण होईल.
- रामदास भटकळ, ज्येष्ठ प्रकाशक, पॉप्युलर प्रकाशन

Web Title: grace birthday