पुराच्या जखमांसोबत ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्सव; केवळ एकमेव गाव बिनविरोध 

Gram panchayat elections in Chandrapur district
Gram panchayat elections in Chandrapur district

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) ः कोरोनाचे संकट असताना वैनगंगेला आलेल्या पुराने ब्रह्मपुरी तालुक्‍यातील तब्बल 65 गावांना तडाखा बसला. हजारो हेक्‍टरवरील पिके खरवडून निघाली. पुराच्या जखमा अजूनही ओल्या आहेत. आता 32 पूरग्रस्त गावात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. यातील केवळ किन्ही या गावाने आदर्श ठेवत निवडणूक बिनविरोध केली. उर्वरित गावांत पुराचा विसर पडून निवडणुकीचा उत्सव सुरू आहे.

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे हा पूर आला होता. 11 हजार 843  हेक्‍टर क्षेत्र पुराने बाधित झाले. 65  गावांना पुराचा विळखा बसला. यातील 32 गावांत पुराने होत्याचे नव्हते केले. 410 घर जमीनदोस्त झाली. एक हजार 476 घरांचे अंशतः नुकसान झाले. महापुराची पाच हजार 600 कुटुंबांना झळ बसली. माणसं, घर, जनावर, शेतीवाडी, रस्ते सारेच प्रभावित झाले. कोट्यवधी रुपयांची कधीही भरून न निघणारी हानी झाली. पुराच्या तडाख्यातून जनजीवन सावरत असताना ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. तालुक्‍यात 32 पूरग्रस्त गावांमध्ये निवडणूक होत आहे. यातील किन्ही मात्र याला अपवाद ठरले आहे. 

निवडणूक टाळून अविरोध निवडणूक केली. महापुराच्या नुकसानभरपाईची  घोषणा शासनाने केली. परंतु अद्याप शंभर टक्के नुकसानभरपाई पूरग्रस्तांना मिळालेली नाही. दुसरीकडे त्याच गावांमध्ये लाखो रुपये खर्चून ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. महापुराचा  फटका बसलेल्या गावांतील नागरिक आर्थिकदृष्टया आधीच हवालदिल झाले आहे.  बिनविरोध निवडणूक घेऊन शासनाकडून मिळणारा निधीतून गावाचा विकास करणे शक्‍य झाले असते. मात्र, राजकीय महत्वाकांक्षामुळे गावकऱ्यांनी ही संधी घालवली, अशी चर्चा आहे. 

दुसरीकडे किन्हीने या संधीचे सोने केले. निवडणूक टाळली असती होणारा खर्च झाला नसता. मतभेद, वादविवाद विसरून गावात एकोपा निर्माण झाला असता. गावातील महत्त्वाचे प्रश्‍न  सोडविण्यासाठी गावकरी  एकत्रित आले असते. मात्र पूरग्रस्त गावातील एका  गावाचा अपवाद सोडला 31 गावातील नागरिकांनी असा समंजसपणा दाखविला नाही. 

विशेष म्हणजे ब्रह्मपुरी तालुक्‍यात वैनगंगा नदीच्या पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी  दोनदा केंद्रीय पथकसुद्धा येऊन गेले. यावरून नुकसानीची कल्पना आपण करू शकतो. पुराच्या पाण्यात गावच्या गाव बुडून गेली. घरे, गुरे, पिके वाहून गेलीत. आता  राजकीय आकांक्षाच्या पूर्ततेसाठी लोकशाहीच्या महापुरात माणस  वाहायला तयार झाली आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com