यवतमाळमध्ये लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीचे वाजणार बिगूल, राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना

चेतन देशमुख
Wednesday, 11 November 2020

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाचशेवर व दुसऱ्या टप्प्यातही तेवढ्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रही दाखल झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला.

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुका व दुसऱ्या टप्प्यातील प्रभागरचनेचा कार्यक्रमही कोरोनामुळे स्थगित करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी दुसऱ्या टप्प्यात असलेल्या ग्रामपंचायतींची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून जिल्ह्यात 'ईव्हीएम' मशीनची प्राथमिक तपासणी सुरू झाली असून, लवकरच बिगूल वाजण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १८ हजार कोटींची मदत

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाचशेवर व दुसऱ्या टप्प्यातही तेवढ्याच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार होत्या. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रही दाखल झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऐनवेळी कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यांतील सर्व प्रक्रियाही स्थगित करण्यात आली. त्यानंतर आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच क्षेत्र सुरू करण्यात येत आहेत. शासकीय कार्यालयातही आता कोरोनाव्यतिरिक्त कामे सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण...

काही दिवसांपूर्वीच दुसऱ्या टप्प्यातील अर्धवट असलेला प्रभागरचना व आरक्षण पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक विभागाला आले होते. त्यानुसार ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानंतर आता पहिल्या टप्प्यातील निवडणुकाही लवकरच होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक विभागाला 'ईव्हीएम' मशीनची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चार दिवस ही तपासणी केली जाणार आहे. सध्या निवडणूक विभागाकडून तपासणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातून ही तपासणी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक विभागाचे कैलास निमकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यवाही सुरू आहे.a


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grampanchayat election will held soon in yavatmal