मुलीच्या लग्नास नकार दिल्याने आजीसह नातीचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

जुळलेले लग्न तोडल्यामुळे मुलीची आई आणि मुलीच्या बहिणीच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील बालाजी वॉर्डात आज, बुधवारी घडली. सुशीला पिंपळकर (वय 55) आणि श्‍वेता राजपूत (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. हत्याकांडातील आरोपी प्रल्हाद गुप्ता (वय 32) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रपूर: जुळलेले लग्न तोडल्यामुळे मुलीची आई आणि मुलीच्या बहिणीच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना शहरातील बालाजी वॉर्डात आज, बुधवारी घडली. सुशीला पिंपळकर (वय 55) आणि श्‍वेता राजपूत (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. हत्याकांडातील आरोपी प्रल्हाद गुप्ता (वय 32) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सुशीला पिंपळकर विधवा आहेत. त्यांना तीन मुली आहेत. दोघींचे लग्न झाले आहे. त्यापैकी एक त्यांच्या घराशेजारीच राहते. लहान मुलीचे लग्न प्रल्हाद गुप्ता याच्याशी जुळले होते. मात्र, काही कारणामुळे सुशीला यांनी ते लग्न मोडले. त्यामुळे प्रल्हादने महिनाभरापूर्वी मुलीच्या घरी जाऊन जिवे मारण्याची धमकी दिली. लग्न करून द्या, असा तगादा त्याने लावला होता. शेजारी राहणारी सुशीलाची विवाहित मुलगी आणि लहान मुलगी काही कामानिमित्त ग्वालियरला गेल्या आहेत. त्यामुळे रात्री झोपण्यासाठी श्‍वेता आजीकडे आली. रात्री 12 वाजताच्या सुमारास प्रल्हाद पुन्हा सुशीला यांच्या घरी आला. त्याने लग्नाचा तगादा लावला. मात्र, सुशीला निर्णयावर ठाम होत्या.

अखेर, चिडून प्रल्हादने त्यांचा गळा आवळून खून केला. पुरावा राहू नये यासाठी चिमुकल्या श्‍वेतालाही त्याने ठार मारले. तसेच घरातील गॅस सिलिंडर सुरू केला. खिडकीचा पडदा पेटविला आणि तो निघून गेला. प्रल्हादची पाठ फिरताच पडदा विझला. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट झाला नाही. आज सकाळी ग्वालियरवरून विवाहित मुलगी मुलीसह परत आली, तेव्हा हे हत्याकांड समोर आले. पोलिसांनी चार जणांना दिवसभरात ताब्यात घेतले. तेव्हा प्रल्हादने खुनाची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रात्री चौकशी सुरूच होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: granddaughter and GrandMother Murder in Nagpur