शरीरसुखाची मागणी करणारा गटसचिव अखेर गजाआड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या गटसचिवाविरुद्घ गुन्हा नोंदविल्यानंतर अखेर त्याला मंगळवारी (ता. 3) दारव्हा पोलिसांनी अटक केली.

दारव्हा (जि. यवतमाळ) : पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या गटसचिवाविरुद्घ गुन्हा नोंदविल्यानंतर अखेर त्याला मंगळवारी (ता. 3) दारव्हा पोलिसांनी अटक केली. नायगाव येथे सोमवारी (ता. 2) उघडकीस आलेल्या या घटनेने सहकार वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

दादाराव इंगोले असे अटकेतील गटसचिवाचे नाव आहे. त्याला निलंबित करण्याची कार्यवाही प्रशासनाने तत्काळ हाती घेतली आहे. पीडित महिला नायगाव येथील रहिवासी असून, तिच्याकडे चार एकर शेती आहे. शेतीपूरक जोडधंदा दुग्धव्यवसाय करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पीडितेने महिला नातेवाइकाच्या माध्यमातून या गटसचिवाशी संपर्क साधला. गटसचिवाने पाच नव्हे तर, दहा लाख रुपये कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले. पीडित महिलेने कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला. मात्र, त्याला पाच ते सहा महिन्यांचा कालावधी झाला. कर्जमंजुरीबाबत महिलेने गटसचिवाला फोन केला असता, त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केली. हे संभाषण महिलेने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याने गटसचिवाचे बिंग फुटले. सोमवारी पीडितेने दारव्हा पोलिस ठाणे गाठून गटसचिवाविरुद्घ तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर आज अटक केली. 

नायगाव येथील गटसचिव दादाराव इंगोले याच्यावर गुन्हा नोंदविल्यानंतर अटक करण्यात आली. ही माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ व जिल्हा देखरेख सहकारी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली. चौकशीअंती निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रेम राठोड, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दारव्हा.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The group secretary is arrested because demand of sex to a woman