पालकमंत्री बावनकुळे म्हणतात, शेतकऱ्यांना तीनस्तरीय मदत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नागपूर : पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तीनस्तरीय मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. 

नागपूर : पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तीनस्तरीय मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. 
परतीच्या पावसामुळे गेल्या दोन महिन्यांत सुमारे 32 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक शेतातील पिकाचे नुकसान झाले असून, नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या 11 नोव्हेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसभा घ्या. पंचनामे करून ग्रामपंचायतींना सर्वेक्षणाचे अहवाल सोपवा. ग्रामसभा ते अहवाल तपासतील, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांनी घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे 10,860 हेक्‍टरवरील कापूस, सोयाबीन, धान, संत्रा पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे 21,953 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यापूर्वी जुलैमधील पावसाने 3993 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने बैठकीत सादर केली. येत्या 11, 12 व 13 नोव्हेंबरला जिल्ह्यातील 778 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेऊन प्रशासनाने केलेले सर्वेक्षणाचे अहवाल ग्रामसभेत द्या. ग्रामसभा ते अहवाल तपासतील. उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे हे अहवाल तपासून 15 नोव्हेंबरपर्यंत शासनाला पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. काटोल, नरखेड भागातील संत्रा पिकांचे नुकसान किती झाले, याचे सर्वेक्षणच कृषी विभागाने केले नाही. मात्र, शेतकऱ्यांनी 90 टक्के संत्रा आणि कापसाचे पीक नष्ट झाल्याचा दावा केला आहे. तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले. 
विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची लागणार यादी 
जिल्ह्यात 51 हजार हेक्‍टरमध्ये शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. प्रत्येक नुकसानग्रस्ताला विम्याची रक्कम मिळाली पाहिजे. पंचनामे करण्यासाठी कंपनीचे कर्मचारी येतील. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नावाची व मोबाईल नंबरची यादी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
अशी मिळणार मदत 
मदतीसंदर्भात शासनाच्या स्थायी सूचना आहेत. या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांना मिळेल. तसेच सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. त्यानुसारही मदत देण्यात येईल. ही रक्कम सरकार जाहीर करेल. तसेच विमा काढणाऱ्यांनाही नुकसानापोटी मदत देण्यात येईल. अशी तीनस्तरीय मदत शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.  
सावरकर यांची उपस्थिती 
बैठकीला आमदार समीर मेघे, कृष्णा खोपडे यांच्यासह नवनियुक्त आमदार टेकचंद सावरकर व मल्लिकार्जुन रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, कृषी अधिकारी शेंडे उपस्थित होते. सावरकर अद्याप सभागृहाचे सदस्य नसतानाही ते बैठकीत हजर असल्याने अनेकांना आश्‍चर्य वाटले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Bawanakule says, Three levels of help to farmers