शेतीविषयक मार्गदर्शनाचा नवा फंडा! घुमवा एक फोन आणि विचारा शंका

farmer.j
farmer.j

गोंदिया : कोणत्याही परिस्थितीवर मात करीत पुढे जायचे, हा मानवी स्वभाव आहे. शेतीचा हा खरा कामाचा हंगाम. अलिकडे शेती व्यवसायाप्रती अत्यंत जागरुकता निर्माण झाली आहे. पीक चांगले यावे, यासाठी शासन आणि कृषी संस्था शेतकऱ्यांना नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कृषी मेळावे आणि चर्चासत्र किंवा प्रत्यक्ष मार्गदर्शन, प्रशिक्षण वर्ग घेणे शक्‍य नाही, यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना फोनच्या माध्यमातून शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली जाते. प्रत्येक पिकाचे नवनवीन वाण बाजारात येतात. त्यामधून कोणते बियाणे निवडायचे, रोग व किडीचे नियंत्रण कसे करावे, पेरणीपूर्व मशागत, बियाण्यांची बिजप्रक्रिया, खरिपाचे नेमके नियोजन कसे करावे, याबाबत कृषी विज्ञान केंद्र हिवरा येथील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना शेतीविषयक ऑन-कॉल मार्गदर्शन करणार आहेत.
कोरोनाच्या अनुषंगाने टाळेबंदी असल्याने कृषी विज्ञान केंद्राअंतर्गत राबविले जाणारे प्रशिक्षण, चर्चासत्र, मेळावे, प्रक्षेत्र भेटी इ. कार्यक्रम रद्द झाले आहे. अशावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवरून शेतीविषयक मुख्यत्वे खरीप हंगामाच्या नियोजनाकरिता तांत्रिक सल्ले देणार आहेत. या सल्ल्यांच्या आधारावर शेती उत्पादन वाढीत भर घालता येते. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्नाची शेती करण्याचे नियोजन शक्‍य होईल. माती परीक्षण केल्यामुळे आपल्या पिकांचे खत व्यवस्थापन योग्यरित्या करता येऊ शकते व शेतजमिनींची उत्पादकता टिकवून उत्पन्नात वाढ करण्यास मदत होईल. कीड व रोग व्यवस्थापन करणे या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र हिवरामार्फत कॉल-ऑन कार्यक्रम राबविण्यात येत असून, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सोबत संलग्न आहे. यात कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एस. देशमुख पशू संगोपन व चारा व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. शास्त्रज्ञ डॉ. एस.जी. पवार या कृषी यांत्रिकीकरण, शेतमालाचे मूल्यवर्धन, धानपीक रोवणी यंत्राबद्दल माहिती सांगतील. तसेच शास्त्रज्ञ मनोज भोमटे बिजप्रक्रिया, धान पिकाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतील. शास्त्रज्ञ आर. डी. चव्हाण भात पिकावरील किडी व रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतील. गणेश खेडीकर हे माती परीक्षणाचे महत्त्व व खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

शास्त्रज्ञ व शेतकरी थेट संवाद होत असल्याने या प्रयोजनाचा प्रभावी उपयोग होईल, असा आशावाद डॉ. एन. एस. देशमुख यांनी व्यक्‍त केला आहे. तसेच www.kvkhiwra.pdkv.ac.in या संकेतस्थळावर भेट देऊन अधिक माहिती मिळवता येईल, असे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com