बंदूक सोडून हाती घेतली लेखणी

Pen
Pen

नागपूर - आर्थिक असमानतेला कंटाळून कधीकाळी बंदूक हातात घेत, चळवळीत जाण्याचा निर्णय घेतला. नक्षलवादी आंदोलनात सहभागी होऊन आपल्या हक्क मिळविता येईल असे वाटले. मात्र, खरी बाजू समजताच, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होत समाज परिवर्तनाचा प्रयत्न करण्याचा ध्यास मनोमन जोपासला. शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन होणार  नाही ही आस मनात घेऊन आत्मसमर्पण करणाऱ्या तरुणांनी कुरखेडा येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या स्टडी सेंटरमध्ये आपल्या शिक्षणास सुरुवात केली आहे. 

नक्षली आंदोलनाच्या हिंसेने समाजामध्ये परिवर्तन होणे शक्‍य नाही. या केंद्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या ‘बॅचलर प्रिपरेटी प्रोग्राम’मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने आपले विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, तो एका गरीब परिवारातील आहे. त्यांच्या आईवडिलांचा काही वर्षांआधी मृत्यू झाला. आज घरामध्ये फक्त मोठा भाऊ, वहिनी आणि पुतणी आहे.

वडिलोपार्जित असलेल्या थोड्याशा शेतीमध्ये संपूर्ण परिवार आपले दिवस काढत आहेत. परिवारामध्ये असलेल्या या गरिबीमुळेच त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला. अकरावीचे शिक्षण सोडून वयाच्या एकोणवीसाव्या वर्षीच नक्षल चळवळीमध्ये सहभागी झाला. १९९५ मध्ये नक्षलवादी चळवळीमध्ये सहभागी झाल्यावर १२ वर्षे काम केले. यावेळी विविध पदांच्या जबाबदाऱ्याही त्यांनी सांभाळल्या. मात्र, वाढत्या वयानुसार त्याला या चळवळीच्या तत्त्वांवर संशय निर्माण  झाला. नक्षलवाद्यांच्या चळवळीचा हेतू बघता यातून समाजाचा विकास होणार नाही ही भावना त्याच्यामध्ये वाढत गेली.

शेवटी २०१५ मध्ये नक्षलवादी आंदोलन सोडून त्याने सरकारसमोर आत्मसमर्पण केले. समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्यावर त्याला खऱ्या आयुष्याचे महत्त्व  कळले. या बदलामुळे त्याने स्वत:ला आता समाजाच्या कार्यामध्ये वाहून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिक्षणाचे महत्त्व त्याने समजले. त्यामुळे इग्नुच्या केंद्रामध्ये प्रवेश घेतला. बारामध्ये अर्ध्यात सुटलेले शिक्षण पूर्ण करीत उच्च शिक्षण घेण्याचे उद्देशही त्याचे आहे. २०१७ इग्नुचे कुरखेडा येथे केंद्र उघडताच त्याचे सहा महिन्यांच्या ‘बीपीपी’ अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. पुढे समाजकार्य अभ्यासक्रमात प्रवेश घेत आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरामध्ये शिक्षण आणि  रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्यास युवा वर्ग कधीही अशा चुकीच्या मार्गाला जाणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com