सुरक्षारक्षकांस मारहाण करून बंदूक पळवली; तिघांविरुद्ध गुन्हा

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

एसीसी सिमेंट कंपनीच्या शिंदोला परिसरात खाणी आहेत. सिमेंटच्या दगडाचे उत्खनन करताना बारूद व महत्त्वपूर्ण साहित्यांचा वापर करण्यात येतो. अतिसंवेदनशील साहित्याची साठवणूक करण्यात येत असल्यामुळे कंपनी प्रशासनाने सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. 

वणी (जि. यवतमाळ) : एसीसी सिमेंट कंपनीच्या खाणीत तैनात सुरक्षारक्षकांना मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातील जिवंत काडतूस व बंदूक घेऊन तीन अनोळखी व्यक्ती पसार झाले. ही घटना बुधवारी (ता. २०) रात्री १२ वाजताच्या दरम्यान शिंदोला येथे घडली.

एसीसी सिमेंट कंपनीच्या शिंदोला परिसरात खाणी आहेत. सिमेंटच्या दगडाचे उत्खनन करताना बारूद व महत्त्वपूर्ण साहित्यांचा वापर करण्यात येतो. अतिसंवेदनशील साहित्याची साठवणूक करण्यात येत असल्यामुळे कंपनी प्रशासनाने सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. 

हेही वाचा  - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन...

घटनेच्या दिवशी महत्त्वपूर्ण साहित्याची साठवणूक असलेल्या परिसरातील टॉवरवर (एसआईएस) कंपनीचे गॅंगमन राम जग्गी सिंह तर खाली इरफान सिकंदर शाह कर्तव्यावर होते. रात्री 12 वाजता खाली पहारा देत असलेल्या इरफान यांचा ओरडण्याचा आवाज सिंह यांना आला. त्यांनी खाली वाकून बघितले असता तोंडाला स्कार्फ बांधून असलेले तीन जण लाकडी दांड्याने मारहाण करीत होते. त्याचवेळी हल्लेखोर टॉवरवर चढले व मारहाण करून १२ बोअरची बंदूक व दहा जिवंत काडतुसे घेऊन दुचाकीवरून चनाखामार्गे पसार झाले. 

घडलेल्या घटनेबाबत सुरक्षारक्षकांनी कंपनीचे व्यवस्थापक अरविंद तुमराम यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळ गाठले व जखमी सुरक्षारक्षकांना उपचारार्थ दवाखान्यात नेले. शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास ठाणेदार सचिन लुले करीत आहेत

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gun of watchman stolen in yavatmal