झिरो डिग्री बारमध्ये गुंडाकडून गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नागपूर - एमआयडीसीतील झिरो डिग्री बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये तोकडे कपडे घातलेल्या तरुणींशी छेडखानी करण्यास मज्जाव करणाऱ्या युवकांवर कुख्यात गुंडाने गोळीबार केला. ही घटना रविवारी रात्री पावणेदोन वाजताच्या सुमारास घडली. गोळीबार होताच चिक्‍कार गर्दी असलेल्या बारमध्ये एकच गोंधळ उडाला. मिळेल त्या रस्त्याने युवक आणि युवती पळू लागल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मिहीर मिश्रा (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश इंद्रपाल कुशवाह (वय ३०, रा. नीलडोह, वॉर्ड क्र. ४) हा वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी काही तरुणींना घेऊन एमआयडीसीतील झिरो डिग्री बारमध्ये गेला होता. रात्री पावणेदोन वाजेपर्यंत डीजेच्या आवाजात राजेश आणि काही तरुणी नृत्य करीत होत्या. त्यावेळी अनेक जण बारमध्ये दारू पीत बसले होते. तरुणींनीही मद्याची झिंग चढून डीजेवर नाचणे सुरू केले. दरम्यान, अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढणे सुरू केले. कुणी व्हिडिओ शुटिंग करीत होते. 

तरुणींचा अवतार पाहून मिहीरने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्याला तरुणी विरोध करीत होत्या. त्यानेही मोबाईलने तरुणींशी सेल्फी काढणे सुरू केले. मात्र, दारूच्या नशेत असलेला मिहीर तरुणींशी चाळे करू लागल्याने राजेशने त्याला हटकले. त्यामुळे दोघांत बाचाबाची झाली. दोघांनीही एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर मिहीरने कमरेला खोचलेली पिस्तूल बाहेर काढून राजेशच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. बारच्या व्यवस्थापकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी राजेशच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

पहाटेपर्यंत बार सुरू
एमआयडीसी, वाडी आणि हिंगणा परिसरातील अनेक बारचे रूपांतर डान्स बारमध्ये झाले आहे. या बारमध्ये पहाटेपर्यंत अर्धनग्न तरुणी डीजेवर ठेका धरतात. या बारमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विशेष पासवर्ड किंवा ओळख लागते. या डान्सबारमध्ये दारूची किंमत तिप्पट असून, मुंबई-औरंगाबाद-पुणे येथील बारगर्ल्स येत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पिस्तूल सहज उपलब्ध
शहरातील अनेक टोळ्यांतील प्रत्येक सदस्याकडे पिस्तूल हमखास मिळते. मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेशातील अनेक मोठमोठ्या व्यापाऱ्यांकडून नागपुरातील दलाल पिस्तूल विकत घेतात. पिस्तूल पाच हजारांपासून ते २० हजारांपर्यंत विकतात. पिस्तुलाची किंमत दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे अनेक जण अवैधरीत्या पिस्तूल बाळगतात. पोलिस यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे शहरात शेकडो अवैध पिस्तूल वापरले जात असल्याची चर्चा आहे.

Web Title: gund firing in zero degree bar