राष्ट्रसंतांच्या प्रार्थना मंदिराचा मुद्दा तापला, निर्णय मागे न घेतल्यास गुरुदेव भक्तांचा आंदोलनाचा इशारा

प्रशिक मकेश्वर
Monday, 23 November 2020

राष्ट्रसंतांनी स्वनिर्मित केलेले प्रार्थना मंदिर जगातील संपूर्ण मानवाच्या उन्नतीसाठी व खऱ्या धर्माची शिकवण देणारे एकमेव सर्वधर्म समभावाचे ऐतिहासिक असे प्रतीक आहे. येथे प्रत्यक्ष राष्ट्रसंतांचा साक्षात वास असून असंख्य गुरुदेवभक्तांच्या भावना या प्रार्थना मंदिराशी जुळल्या आहेत. त्यामुळे अशी वास्तू नष्ट करणे योग्य नाही, असे गुरुदेवभक्तांचे म्हणणे आहे. 

तिवसा ( जि. अमरावती ) :  अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवान स्पर्शाने तयार झालेल्या प्रार्थना मंदिर स्थळ पाडण्याचा निर्णय मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे या निर्णयाला विरोध करत प्रार्थना मंदिर बचाव समिती व सर्व गुरुदेव भक्ताच्या वतीने मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिलाय. आज त्यांनी तिवसा येथे पत्रकार परिषद घेऊन विरोध दर्शविला. 

या वास्तुशी लाखो गुरुदेवभक्तांची श्रद्धा जुळली असून वस्तूंचे जतन करणे हे गुरुदेवभक्तांचे कर्तव्य आहे. मात्र, आश्रमातील ज्याठिकाणी महाराज प्रार्थना व भजन करत होते ते प्रार्थना मंदिर जीर्ण होऊन कधीही पडण्याच्या स्तिथीमध्ये आहे. त्यामुळे हे प्रार्थना मंदिर पाडण्याचा निर्णय गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला असून त्याला लागूनच भव्य प्रार्थना सभागृह बांधण्यात आले आहे. राष्ट्रसंतांनी स्वनिर्मित केलेले प्रार्थना मंदिर जगातील संपूर्ण मानवाच्या उन्नतीसाठी व खऱ्या धर्माची शिकवण देणारे एकमेव सर्वधर्म समभावाचे ऐतिहासिक असे प्रतीक आहे. येथे प्रत्यक्ष राष्ट्रसंतांचा साक्षात वास असून असंख्य गुरुदेवभक्तांच्या भावना या प्रार्थना मंदिराशी जुळल्या आहेत. त्यामुळे अशी वास्तू नष्ट करणे योग्य नाही, असे गुरुदेवभक्तांचे म्हणणे आहे. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : आचारसंहितेचे उल्लंघन...

गुरुदेव सेवा मंडळाच्या या निर्णयाअंती आश्रम येथील विश्वस्तांनी सात दिवसांच्या आत प्रार्थना मंदिर पाडण्याच्या निर्णयाचा खुलासा करावा, अन्यथा प्रार्थना मंदिर पाडण्याच्या या निर्णयाला आंदोलनाच्या मार्गातून हाणून पाडू व न्याय घेऊ, असा इशारा सुद्धा या पत्रकार परिषदेत प्रार्थना मंदिर बचाव समितीकडून देण्यात आला.  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दी विकास आराखड्यातून अगदीच प्रार्थना मंदिराच्या पाठीमागे हुबेहूब अशी प्रार्थना मंदिर इमारत बांधण्यात आली आहे. या प्रार्थना मंदिरात एकाच वेळी जवळपास हजारो गुरुदेव भक्त ध्यान व प्रार्थनेला बसू शकतील, असे सभागृह बांधण्यात आले आहे. जुन्या प्रार्थना मंदिराला भेगा कडून भिंती निकृष्ट झाल्या आहेत. त्यामुळेच अखिल भारतीय गुरुदेवसेवा मंडळांनी सर्वानुमते प्रार्थना मंदिर पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.  

हेही वाचा - ऑनलाइन बैठकीत का संतापले अनिल देशमुख?

महाराजांनी एक खंत व्यक्त केली होती. मी माझ्या आयुष्यात खूप कामे केली. मात्र, काही कामे घाईघाईत झाली. जसे की हे प्रार्थनामंदिर मला मोठे बांधायचे होते. जेणेकरून या ठिकाणी पाच हजाराच्यावर भक्त ध्यान व प्रार्थना करतील. मात्र तसे मी करू  शकलो नाही. भविष्यात हे प्रार्थना मंदिर मोठे व्हावे यासाठी मी या प्रार्थना मंदिराला कठडे लावले आहेत. त्यामुळे टिनाचे शेड मोठे करता येईल असे महाराजांनीच म्हटले होते. त्यामुळे हे मंदिर मोठे करण्याचे स्वप्न महाराजांचेच असल्याने आम्ही या प्रार्थना मंदिराच्या इमारतीची निर्मिती केली आहे. मानव जातीच्या उन्नतीच्या या साधन केंद्राला विरोध करणे म्हणजेच महाराजांच्या इच्छेला विरोध करण्यासारखे आहे. 
- प्रकाश महाराज वाघ, सर्वाधिकारी, अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज मोझरी. 

हेही वाचा - कामे तर झाले, पण देयकेच मिळेना; चार वर्षांपासून केली जातेय अडवणूक

महाराजांनी हे आश्रम व येथील प्रत्येक वस्तू ही श्रमदानातून बांधली आहे. इथल्या प्रत्येक गोष्टीशी देशातील गुरुदेवभक्तांची साधना, भावना, श्रद्धा जोडली असल्याने या आश्रमातील कुठलीही वस्तू तोडण्याचा प्रयत्न करू  नये. प्रार्थनामंदिर जर पाडले तर संपूर्ण गुरुदेव भक्तांच्या श्रद्धेला ठेच पोहोचेल. त्यामुळे प्रार्थनामंदिर आहे तसेच जतन करून ठेवावे अन्यथा सर्व गुरुदेवभक्त रस्त्यावर येऊन आंदोलन करतील.
- प्रदीप बोके, गुरुदेवभक्त, वरखेड व प्रार्थना मंदिर बचाव समिती प्रमुख. 

हेही वाचा - शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू, शाळा सुरू होताच वाढला प्रचाराचा जोर

गरज आणि श्रद्धा दोन्हीचा विचार व्हावा - 
दररोज ध्यान व प्रार्थनेला येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे आणि ती वाढतच आहे. लोकांना बाहेर किंवा व्हरांड्यात  बसावे लागते, हे पाहता नवीन प्रार्थना मंदिर गरजेचे होतेच. दररोजच्या उपासनेसाठी त्याचा वापरही व्हायला पाहिजे. गरजेबरोबर श्रद्धेचा विचार करून जुने प्रार्थना मंदिर राष्ट्रसंतांचे स्मारक म्हणून जतन करून ठेवता आले तर बरे होईल. 
- रवी मानव, संचालक, श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुल, गुरुदेवनगर. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे परिवर्तनवादी विचाराचे होते. गुरुकुंजमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या दृष्टिकोनातून नवीन प्रार्थना मंदिर गरजेचे आहे. परंतु, सर्वांच्या संमतीने हा निर्णय व्हावा 
- अमर वानखडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंच. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gurudev devotees oppose to decision to collapsed of rashtrasant prayer temple in gurukunj ashram mojhri