esakal | 'दवाखान्यात भरती आहे, पैसे द्या', चक्क पोलिस अधीक्षकांच्या नावाने पैशांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Facebook account opened in the name of the Commissioner of Police

'दवाखान्यात भरती आहे, पैसे द्या', चक्क पोलिस अधीक्षकांच्या नावाने पैशांची मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : सोशल मीडियाचा वापर वाढत असताना हॅकर्स मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यासाठी सक्रिय झाले आहेत. चक्क पोलिस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फ्रेंडलिस्टमधील मंडळींकडे पैशाची मागणी करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: मित्रच निघाला मास्टरमाईंड, शिक्षकाला लुटणाऱ्या चौघांना अटक

पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांच्याच नावाने फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले. फ्रेंडलिस्टमधील मयूर वानखेडे याच्या मेसेंजवर चॅट करीत दिलेल्या क्रमांकावर गुगल पेद्वारे पैशाची मागणी केली. मात्र, पोलिस अधीक्षक आपल्याला पैसे कसे मागू शकतात, असा प्रश्‍न त्याच्या मनात आला. तत्काळ त्याने सायबर शाखेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून माहिती दिली. सोबतच चॅटींगचे स्क्रीन शॉटही पाठविण्यात आले. सायबर शाखेच्या अधिकार्‍यांनी ते फेसबुक अकाउंट डिलीट केले. संबंधित तोतया व्यक्तीने इतरांनाही पैशाची मागणी केल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पैसे मागताना दवाखान्यात भरती असल्याचे कारण सांगितले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांना 'तो' मोबाइल क्रमांक मिळाला असून, तोतयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अनेकांच्या नावे बनावट अकाउंट -

तोतयांनी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वकील, यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे. फ्रेंडलिस्टमधील लोकांना मॅसेज पाठवून पैशाची मागणी केली जात आहे. एका सामाजिक कार्यकर्त्यानेही अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

loading image