Hajibaba
Hajibaba

अखेर हाजीबाबाच्या आवळल्या मुसक्‍या

नागपूर - नक्षलवाद्यांना शस्त्रसाठा पुरवीत असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाच्या नागपूर युनिटने सोमवारी घुग्गुस येथून हाजीबाबा शेख सरवर याच्या मुसक्‍या आवळल्या. त्याच्याकडून पिस्तूलही हस्तगत करण्यात आले.

एटीएसच्या पथकाने २४ जानेवारी रोजी नागपूर रेल्वेस्थानकावरून वणीचा राहणारा संजय खरे आणि बिहारच्या सुपनसिंगला अटक केली होती. त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्वर आणि २० जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली होती. नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवीत असल्याच्या संशयावरूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. चौकशीत शस्त्रसाठा बिहारवरून खरेदी केल्याची आणि हाजीबाबासाठी काम करीत असल्याची कबुली संजयने दिली. तर, सुपनसिंग याला शस्त्रसाठा सुरक्षित पोहोचवून देण्यासाठी सोबत घेतले होते. या बदल्यात त्याला ८ हजार रुपये दिले जाणार होते. संजयने दिलेल्या माहितीवरून, एटीएसच्या पथकाने हाजीबाबावर लक्ष केंद्रित केले होते. परंतु, तो सतत ठिकाणे बदलत फिरत होता. सोमवारी तो घुग्गुसला आला असल्याची माहिती मिळाली. लागलीच सापळा रचून शिताफीने त्याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळ अत्याधुनिक पिस्तूलही आढळून आले. 

अनेक गुन्हे असूनही हाजीबाबा मोकाटच
हाजीबाबावर चंद्रपुरात ६, घुग्गुस येथे १३, भद्रावती येथे १ आणि गडचांदूर येथे २ असे २५ गुन्हे दाखल आहेत. त्यात २ खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी वसुली, लूटमार, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय नागपूर, यवतमाळ आणि तेलंगणा येथेही गुन्हे दाखल आहेत. नागपूरचा कुख्यात गुंडा शेखू खान याचा तो प्रतिस्पर्धी मानला जातो. 

काही वर्षांपूर्वी हाजीबाबाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने धरमपेठ हद्दीत एकाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्याला २ वर्षांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपारही करण्यात आले होते. फरारीच्या काळातही तो घुग्गुस येथील घरीच रहायचा. 

संजय खरे ‘पुलिस बॉय’!
शस्त्र तस्करीच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या संजय खरे याचे वडील पोलिस खात्यातून पोलिस निरीक्षक पदावरून निवृत्त झाल्याची माहिती आहे. निवृत्तीनंतर वडिलांनी वणी येथे बिअरबार सुरू केला होता. परंतु, तो बंद पडला. त्यानंतर संजय गुन्हेगारीत सक्रिय झाल्याची माहिती आहे.

कोलमाफिया बाबा शस्त्र तस्करीतही सक्रिय
प्राप्त माहितीनुसार, खाणीतून निघालेला कोळसा चोरून नेणे, कोळशाचे ट्रक लुटणे यासारख्या घटनांमध्ये त्याचे नाव नेहमीच पुढे येते. याशिवाय तो शस्त्रांचीही तस्करी करतो. यासाठी त्याने चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणीत टोळ्या तयार केल्या आहेत. त्याच्या सूचनेनुसारच टोळ्या कार्य करत असतात. बिहारमधील मुंगेर येथून १५ ते ३० हजारांत रिव्हॉल्वर, पिस्तुल खरेदी करून ५० हजार ते १ लाखांपर्यंत आणि बुलेटचीही ५०० ते १ हजार रुपयाला एक याप्रमाणे विक्री करीत होता. मागणीनुसार तो नक्षलवाद्यांनाही शस्त्रसाठा पुरवित असल्याचे सांगितले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com