हलबांचे आंदोलन स्थगित

File photo
File photo

हलबांचे आंदोलन स्थगित
नागपूर : मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची लेखी हमी देण्याच्या आश्‍वासनानंतर गुरुवारी रात्री हलबा समाजबांधवांनी आठ दिवसांपासून सुरू असलेले अनिश्‍चितकालीन उपोषण स्थगित केले. आठ दिवसांपासून उपोषणावर असलेले कमलेश भगतकर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक; पण स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
हलबा समाजाला संविधानदत्त अधिकार मिळण्यासह वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांतिसेनेतर्फे 15 नोव्हेंबरपासून गांधीबागेतील रा. बा. कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ अनिश्‍चितकालीन उपोषण सुरू केले होते. विविध पक्ष, संस्था, संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. समाजातील काही अतिउत्साही तरुणांनी बसेसची तोडफोड, रस्त्यांवर टायरची जाळपोळ केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लाभले. या प्रकाराची गंभीर दखल घेत अखेर शासनाने नमते घेत गुरुवारी रात्री एसडीओ पांडे यांना आंदोलनस्थळी पाचारण केले. आंदोलकांशी चर्चेनंतर त्यांनी सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती दिली. पण, हे म्हणणे लेखी स्वरूपात देण्याचा आग्रह आंदोलकांनी धरला. त्यानुसार, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसह लेखी आश्‍वासन देण्याची आणि त्यानंतर या प्रश्‍नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक लावून देण्याची ग्वाही पांडे यांच्याकडून मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय समाजाकडून घेण्यात आला.
दरम्यान, आठ दिवसांच्या उपोषणामुळे भगतकर यांची प्रकृती चांगलीच ढासळली होती. आंदोलन स्थगित होताच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्‍टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक; पण स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
सरकारची विनंती मान्य करीत आंदोलन तूर्तास स्थगित केले. मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलनाचा सामना सरकारला करावा लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com